Sunday, July 27, 2025
घरमहाराष्ट्रपोलादपूर बाजारपेठेतील घरफोडीच्या तपासादरम्यान आरोपींकडून दोन मोटारसायकलीही हस्तगत.... पोलादपूर पोलिसांनी 24...

पोलादपूर बाजारपेठेतील घरफोडीच्या तपासादरम्यान आरोपींकडून दोन मोटारसायकलीही हस्तगत…. पोलादपूर पोलिसांनी 24 तासात केले आरोपीला भोर येथून जेरबंद

पोलादपूर (शैलेश पालकर)- शहरातील बाजारपेठेमध्ये असलेल्या दुकानाचे लोखंडी शटर उचकटून 6900 रुपयांची रक्कम चोरणाऱ्या घरफोडीच्या आरोपीचा तपास करताना त्याच्याकडून दोन मोटरसायकली देखील 3 हजार रुपये रोख रक्कमेसह हस्तगत करण्यात आल्या. घरफोडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर केवळ 24 तासात आरोपीला ताब्यात घेण्यात पोलादपूर पोलिसांना यश आले आहे.
पोलादपूर शहरातील बाजारपेठेमध्ये असलेल्या आशीर्वाद जनरल स्टोअर्स मध्ये 13 जुलै रोजी रात्री अज्ञात इसमाने दुकानातील लोखंडी शटर उचकटून एकूण 6900 रुपयांच्या नोटा चोरल्या. या घटनेची फिर्याद दुकानदार अजय गांधी यांनी 17 जुलै रोजी पोलादपूर पोलीस ठाण्यात दिली.
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ फिर्यादी अजय गांधी राहत असलेल्या परिसरात सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. पोलादपूर शहरामधील जवळपास 8 ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज पाहून एक संशयित इसम आढळून आला. त्यांनतर त्याची ओळख पटवण्याकामी पोलादपूर तालुक्यातील पोलीस पाटील व्हॉट्सअप ग्रुपवर सीसीटीव्ही फुटेज पाठविण्यात आले. त्यात यश येवून संशयित इसमाचा मामा हा पोलादपूर नजीक रानबाजीरे आदिवासी वाडीत राहत असल्याचे समजले. तात्काळ मामाकडे जावून त्यास फुटेज दाखविले असता त्याने लगेचच फुटेजमधील व्यक्तीला ओळखत असल्याचे सांगून त्याचे नाव राजू दिनेश मुकणे (वय.25 रा. कावळे कुंभार्डे आदिवासी वाडी ता. महाड,जि. रायगड) असल्याचे सांगितले.
त्या अनुषंगाने आरोपी राहत असलेल्या कावळे कुंभार्डे गावात गोपनीय माहिती काढून त्याच्या ठावठिकाणाबाबत माहिती मिळवून त्यास काल दि 18 जुलै 2025 रोजी घरफोडीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली.
आरोपी राजू मुकणे याच्या अटकेदरम्यान पोलादपूर पोलिसांनी आरोपीची झाडाझडती केली असता त्याने पोलादपूरमध्ये 01 दुचाकी आणि राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कापूरहोळ, जि. -पुणे येथे 01 दुचाकी देखील चोरल्याचे कबूल केले. त्याच्याकडून अंदाजे 60 हजार रुपये किंमतीची टिव्हिएस विक्रांत(एम एच 06 बी आर 7297) मोटार सायकल, तीन हजार रुपये रोख रक्कम आणि काळ्या रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर 25 हजार रुपये किंमतीची मोटार सायकल (एमएच12 जेटी 8701) असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

पोलादपूर बाजारपेठेतील घरफोडीच्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान 24 तासांच्या आतच गुन्ह्याची उकल करण्यात सपोनि आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुंढे, पोलीस हवालदार स्वप्नील कदम, पोलीस शिपाई कांजर, घुगे, जाधव या पोलीस कर्मचाऱ्यांनी कामगिरी पार पाडली.
फोटो कॅप्शन —- पोलादपूर बाजारपेठेतील घरफोडीच्या तपासादरम्यान दोन मोटारसायकलींसह पकडलेल्या आरोपी राजू मुकणे यांच्यासोबत सपोनि आनंद रावडे, उपनिरीक्षक मुंढे, हवालदार स्वप्नील कदम, शिपाई कांजूर, घुगे व जाधव आदी पोलीस कर्मचारी (छाया-शैलेश पालकर)

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments