प्रतिनिधी(प्रताप भणगे) : महारुगडेवाडी येथील धोकादायक स्थितीत असलेला विद्युत खांब अखेर आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या तत्परतेने हटविण्यात आला आहे. या निर्णयामुळे गावात समाधानाचे वातावरण पसरले आहे.
या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे मंडल अध्यक्ष मा. प्रविण साळुंखे व गावातील काही ग्रामस्थांनी धोकादायक खांबाची तातडीने दखल घेण्याची विनंती केली होती. संबंधित पोल पूर्णपणे जीर्णावस्थेत होता व झाडात अडकलेला असल्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे, जिंती-उंडाळे रस्त्यालगत असलेल्या या पोलवरून तीन ठिकाणी वीज पुरवठा होत होता, तसेच जवळील काही घरांवर त्याच्या कोसळण्याचा धोका निर्माण झाला होता.
ही बाब समजताच आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी त्वरीत महावितरण विभागाशी संपर्क साधून खांब बदलण्याचे निर्देश दिले. विभागाने तातडीने कार्यवाही करत जुना खांब हटवून नवीन खांब बसवला.
या तत्काळ प्रतिसादाबद्दल महारुगडेवाडीतील ग्रामस्थांनी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे विशेष आभार मानले असून, त्यांच्या कार्यक्षमतेमुळे संभाव्य मोठा अपघात टळला असल्याचे सांगण्यात येत आहे.