कराड(प्रताप भणगे) :
कालेटेक (ता. कराड) येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत असलेल्या रस्ता व पुलाजवळ मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून, प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.
मत्स्य व्यवसाय, कोंबडीपालन, हॉटेल व्यवसाय आणि इतर व्यापाऱ्यांकडून रोज मोठ्या प्रमाणात कचरा या ठिकाणी टाकला जातो. त्यामुळे दिवसभर कुत्रे आणि इतर जनावरे येथे खाण्यासाठी गर्दी करतात आणि वाहनांवर तसेच नागरिकांवर हल्ला करतात, असे प्रकार वाढले आहेत.
शासनाकडून घनकचरा व्यवस्थापनावर ६०% खर्च केला जात असतानाही या ठिकाणी स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे. यासंदर्भात मीडिया आणि नागरिकांनी वारंवार आवाज उठवला असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही.
याठिकाणी दुर्गंधी, अस्वच्छता आणि अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले असून, नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. त्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.