Saturday, September 20, 2025
घरमहाराष्ट्रलोकलच्या दरवाजात ‘बॅगवाल्यांना’ लाल झेंडा – चार मृत्यूनंतर रेल्वेचा ‘टफ’ निर्णय!

लोकलच्या दरवाजात ‘बॅगवाल्यांना’ लाल झेंडा – चार मृत्यूनंतर रेल्वेचा ‘टफ’ निर्णय!

मुंबई – लोकलच्या दरवाजात बॅग घेऊन उभं राहणं आता धोकादायकच नाही, तर थेट बेकायदेशीर ठरणार आहे!
अलीकडेच घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर – जिथे चालत्या लोकलमधून चार प्रवासी खाली पडून मृत्युमुखी पडले – रेल्वे प्रशासनाने आता कडक निर्णय घेतला आहे. रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि लोकल पोलीस एकत्रित कारवाई करत आहेत. दरवाजात बॅग घेऊन उभं राहणाऱ्या प्रवाशांना थेट थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गर्दीच्या तासांमध्ये – विशेषतः संध्याकाळच्या पीक अवर्सला – मुख्य स्थानकांवर अतिरिक्त जवान तैनात करण्यात येणार आहेत.

हे सगळं सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेलं पाऊल आहे. कारण अलीकडील दिवा-मुंब्रा दुर्घटनेमुळे रेल्वे हादरली आहे.

ही घटना सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान, समोरासमोरून दोन लोकल धावत होत्या – एक कसाऱ्याकडे, तर दुसरी सीएसएमटीकडे. दोन्ही ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होती. दरवाजात उभे असलेल्या अनेक प्रवाशांच्या खांद्याला बॅगा होत्या. ट्रेनच्या वेगात एकमेकांना धक्के बसले आणि त्याच क्षणी आठ प्रवासी खाली फेकले गेले. त्यातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेचा तपास करताना सुरक्षा यंत्रणांना हे लक्षात आलं की, बॅगांचा धक्का आणि प्रवाशांची असंतुलित स्थिती हेच मुख्य कारण होतं. त्यामुळे आता दरवाजात बॅग घेऊन उभं राहणं थांबवण्याचा स्पष्ट निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाचं म्हणणं आहे. बॅगेसकट दरवाजात उभं राहणं म्हणजे स्वतःचं आणि इतरांचं आयुष्य धोक्यात घालणं आहे.
या पार्श्वभूमीवर दरवाजात उभे राहणाऱ्या आणि बॅग घेऊन गर्दी वाढवणाऱ्या प्रवाशांवर सतत नजर ठेवण्यात येणार आहे. मुंबईकरांनो, ही केवळ नियमावली नाही, तर तुमचं जीवन सुरक्षित ठेवण्यासाठीचा इशारा आहे.
फुटबोर्डवर काही इंचांवर तोल सांभाळत उभं राहणं, त्यात खांद्याला अडकवलेली जड बॅग आणि शेजारून जाणाऱ्या ट्रेनमधील प्रवाशांचा धक्का – हे सर्व एकत्र आल्यावर मृत्यू काही क्षणांचाच खेळ ठरतो.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments