ताज्या बातम्या

जेष्ठ पत्रकार अरविंद कुळकर्णी यांचे निधन

मुंबई – ज्येष्ठ पत्रकार आणि अधोरेखित ह्या युट्यूब वाहिनीचे संपादक श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांचे रविवार १५/६/२५ रोजी सकाळी ८.३० चे सुमारास विले पार्ले येथे हृदयविकाराच्या तीव्र आघाताने निधन झाले.

कुलकर्णी यांनी,आचार्य अत्र्यांच्या ‘मराठा’ मधून पत्रकारितेला प्रारंभ केला . त्यानंतर दीर्घकाळ इंग्रजी भाषेतील ‘मिड डे’ मध्ये राजकीय संपादक ह्या पदावर काम केलं. राजकारण अत्यंत जवळून पाहणारा, त्यातून विविध पक्ष संघटनांच्या नेते आणि कार्यकर्ते ह्यांच्याशी निर्माण झालेल्या संबंधांतून राष्ट्रीय महत्वाच्या विषयावर आशयनिर्मिती करणारा, भाष्य करणारा एक लढवय्या पत्रकार म्हणून अरविंदराव स्मरणात राहतील.
स्वातंत्र्य वीर सावरकर, डॉ. हेडगेवार, पु. भा. भावे अशी श्रद्धास्थाने असलेले अरविंद कुलकर्णी यांनी काही वर्षे साप्ताहिक विवेक, मासिक धर्मभास्कर चे ही संपादन केले.

‘हिंदुस्थान समाचार’ ह्या राष्ट्रीय वृत्तसंस्थेचे मुंबईतील ब्युरोप्रमुख म्हणूनही त्यांनी लक्षणीय काम केलं होतं. अनेक तरुणांना राष्ट्रीय विचाराच्या पत्रकारितेचे धडे दिले.

जवळपास दशकभर पु. भा. भावे स्मृतिसमितीचे कार्यवाह म्हणून त्यांनी मुंबई आणि परिसरात अनेक उपक्रम यशस्वी केले.
गेली चार वर्षे कुलकर्णी हे’अधोरेखित’ नावाचा यु वाहिनीवर भाष्यपट प्रस्तुत करीत होते. त्यातूनही अनेक वैचारिक विचार आणि हिंदुत्ववादी विचारांचे विषय ते मांडत असत.

ज्येष्ठ पूत्र डॉ. मल्हार मुंबई आय आय टीत संस्कृत भाषा विभागप्रमुख आहेत. तर केदार हे अरुणाचल प्रदेशात कल्याण आश्रमाचा पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून गेली जवळपास दोन दशके काम करीत आहेत. ओंकार कुलकर्णी हा इंग्रजी भाषेतील कवी , चित्रपट आणि मालिका क्षेत्रातही लेखक – अभिनेता म्हणून कार्यरत आहे.

निरपेक्षपणे पण पुढे होत, लढाऊपणे हिंदुत्त्वाचं काम करणारा एक स्वयंसेवक पत्रकार, मार्गदर्शक म्हणून अरविंद विठ्ठल कुलकर्णी हे नाव पत्रसृष्टीत दीर्घकाळ स्मरणात राहील.

मुंबई मराठी पत्रकार संघ वतीने ज्येष्ठ पत्रकार अरविंद कुलकर्णी यांचे निधन झाले याबद्दल अध्यक्ष संदीप चव्हाण आणि कार्यवाह शैलेंद्र शिर्के यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top