Sunday, July 27, 2025
घरमहाराष्ट्रमुंबईतील पायलीपाडा येथील अतिक्रमण तातडीने हटवण्याचे महसूलमंत्र्यांचे निर्देश

मुंबईतील पायलीपाडा येथील अतिक्रमण तातडीने हटवण्याचे महसूलमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : पायलीपाडा (चिता कँप, ट्रॉम्बे) येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण तातडीने हटवण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. भूमाफियांना कायमस्वरूपी धडा शिकवण्याचा इशारा देतानाच, राज्यातील सर्व शासकीय जमिनींवरील अतिक्रमणांची माहिती सादर करण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

महसूलमंत्र्यांच्या दालनात यासंदर्भात आयोजित बैठकीत आमदार प्रवीण दरेकर, अपर जिल्हाधिकारी (मुंबई उपनगर) मनोज गोहाळ, गृह निर्माण विभागाचे डॉ. दादाराव दातकर, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेश बावरोही आणि तक्रारदार निशांत घाडगे उपस्थित होते.

स्थानिकांनी केलेल्या तक्रारीनुसार, पायलीपाडा येथे भूमाफियांनी झोपडपट्ट्यांच्या नावाखाली चार ते पाच मजली बेकायदेशीर इमारती उभारल्या आहेत. आगरी-कोळी बांधवांचे परंपरागत गावठाण असलेल्या या भागाची ओळख अतिक्रमणामुळे पुसट होत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. महसूलमंत्र्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने अतिक्रमण हटवण्याचे स्पष्ट निर्देश दिले. यासोबतच, भविष्यात अशा प्रकारच्या बेकायदेशीर बांधकामांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाईचे संकेतही त्यांनी दिले.

अतिक्रमणांमुळे गावठाणाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाला धक्का पोहोचत असल्याचे तक्रारदारांनी सांगितले. प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी लावून धरली आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments