Monday, July 28, 2025
घरमहाराष्ट्रविनय नारायण, गायत्री पन्हाळकर, अशोक जाधव, हेमंत चव्हाण यांना यंदाचा " अंबुद...

विनय नारायण, गायत्री पन्हाळकर, अशोक जाधव, हेमंत चव्हाण यांना यंदाचा ” अंबुद ” पुरस्कार जाहीर

मुंबई : ज्येष्ठ लेखक विनय नारायण, साहित्यप्रेमी अशोक जाधव, वाचन संस्कृतीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणारे हेमंत चव्हाण आणि मराठीत पैकीच्या पैकी गुण मिळवणारी विद्यार्थिनी गायत्री पन्हाळकर यांना यंदाचा “अंबुद” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

स्वामीराज प्रकाशन आणि पल्लवी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दर वर्षी ” अंबुद ” या पावसाळी उत्सवाचे आयोजन करण्यात येते. साहित्य, नाट्य आणि संगीत विषयक विविध कार्यक्रम या उत्सवात सादर केले जातात. प्रबोधन प्रयोगघर, कुर्ला येथे होणाऱ्या या उत्सवात रसिकांना मुक्त प्रवेश तर असतोच, पण वाफाळलेला चहा आणि गरमागरम कांदा भजीचा आस्वादही घेता येतो. यंदाचा उत्सव १२/१३/२६ आणि २७ जुलै रोजी होणार असून मराठी भाषेसाठी विशेष कार्य करणाऱ्या चार व्यक्तींना यंदाही खास पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
यंदाच्या “अंबुद” पुरस्काराचे पहिले मानकरी आहेत प्रसिद्ध लेखक विनय नारायण. इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांना मराठी वाचनाची गोडी लागावी यासाठी विनय नारायण यांनी एक अभिनव पुस्तक प्रयोग केला आहे. दुसरे मानकरी आहेत हेमंत चव्हाण. करिरोड सारख्या गिरणगावात पुन्हा एकदा वाचन संस्कृती रुजावी यासाठी चव्हाण यांनीही अभिनव प्रयोग केला असून गायत्री पन्हाळकर ही विद्यार्थिनी पुरस्काराची तिसरी मानकरी आहे. बारावी परीक्षेत मराठी विषयात गायत्री हिने शंभर पैकी शंभर गुण मिळवले आहेत. तर माजी पोलिस निरीक्षक अशोक जाधव हे साहित्यप्रेमी आणि सजग वाचक म्हणून साहित्य वर्तुळात ओळखले जातात. ते पुस्तक विकत घेऊनच वाचतात हे विशेष!
मराठी भाषेसाठी आनंददायी ठरणाऱ्या या पुरस्कारांची घोषणा आज स्वामीराज प्रकाशनचे रजनीश राणे आणि पल्लवी फाउंडेशनचे डॉ. भाऊ कोरगावकर यांनी एका संयुक्त पत्रकाद्वारे केली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments