ताज्या बातम्या

व्यसनमुक्ती पथनाट्य स्पर्धेत विवेकानंद कॉलेज अव्वल

नवी मुंबई : अन्वय व्यसनमुक्ती केंद्र आणि नशाबंदी मंडळ–महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरमहाविद्यालयीन व्यसनविरोधी पथनाट्य स्पर्धेत चेंबूर येथील विवेकानंद कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्सने प्रथम क्रमांक पटकावला. नेरुळ येथील एसआयईएस महाविद्यालयाने द्वितीय, तर डी. वाय. पाटील स्कूल ऑफ फार्मसीने तृतीय क्रमांक मिळवला.
वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात १ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून रंगलेल्या या स्पर्धेत मुंबई, नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील तब्बल १३ महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग घेतला. विविध पथनाट्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी व्यसनांचे दुष्परिणाम, त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्या आणि व्यसनमुक्त समाजाची गरज प्रभावीपणे मांडली.
पारितोषिक वितरण समारंभात नशाबंदी मंडळ–महाराष्ट्र राज्याचे चिटणीस अमोल मडामे यांनी समाजातील मान्यवर व्यक्तींचे अनुकरण नव्या पिढीकडून केले जाते, त्यामुळे या घटकांनी सर्वप्रथम स्वतःला व्यसनांपासून दूर ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले. “वाईट व्यसनांऐवजी चांगल्या कामाची नशा नव्या पिढीला लागली पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.
दारू किंवा कोणत्याही अंमली पदार्थांमुळे ताण, चिंता, तणाव अथवा दडपण दूर होते, हा गैरसमज मनातून काढून टाकण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार राजेंद्र घरत यांनी आपल्या मनोगतात अशा स्पर्धा ‘जेन झी’च्या तरुणाईला विधायक मार्गाकडे नेण्यासाठी उपयुक्त ठरतील, असे सांगत सहभागी सर्व स्पर्धक तसेच विजेत्या संघांचे अभिनंदन केले.
स्वामी विवेकानंद ज्युनियर कॉलेज, चेंबूर आणि एफ. जी. नाईक कॉलेज, कोपरखैरणे यांच्या संघांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी रवि वाडकर आणि अभिनेत्री प्रितम सिंग यांनी जबाबदारी सांभाळली.
यावेळी नवी मुंबई समन्वय संस्थेच्या पदाधिकारी अमरजा चव्हाण, स्त्रीमुक्ती संघटनेच्या विश्वस्त वृषाली मगदूम यांचीही उपस्थिती होती. विजेत्या महाविद्यालयीन संघांनी जल्लोषपूर्ण वातावरणात मंचावर येत पारितोषिके स्वीकारली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अजित मगदूम यांनी केले, तर ‘अन्वय’चे समुपदेशक उदय तिळवे यांनी सूत्रसंचालन केले.

Scroll to Top