ताज्या बातम्या

संत तुकाराम महाराजांच्या तपोभूमीच्या संरक्षणासाठी वारकरी आक्रमक; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

मुंबई, दि. १ सप्टेंबर : पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र देहूजवळील जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची ध्यान-साधना तपोभूमी असलेल्या भामचंद्र-भंडारा डोंगरावरील कथित अवैध उत्खनन आणि अतिक्रमण तातडीने थांबवावे, अशी मागणी संतभूमी संरक्षक संघर्ष समिती आणि अखिल भारतीय मराठा महासंघाने केली आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात आली. भामचंद्र-भंडारा डोंगराला २०११ मध्ये राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे. १८०० सालच्या दस्तऐवजानुसार भामचंद्राचा डोंगर सरकारी असल्याचा दावा करण्यात आला. तसेच, २०१६ मध्ये मावळ तहसीलदारांनी हा परिसर मूळ वनविभागाच्या मालकीचा असून सरकारजमा करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल दिला होता; मात्र अद्याप कारवाई प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.
संरक्षित स्मारकाच्या परिसरात कायद्याचे उल्लंघन करून उत्खनन, क्रशर, पेट्रोल पंप, गोडाऊन आणि अन्य बांधकामे सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला. जेसीबीच्या उत्खननामुळे होणाऱ्या कंपनांमुळे भामचंद्राचा कडा ढासळण्याचा धोका असल्याचेही समितीने नमूद केले.
शासनाने २०११ ची अधिसूचना तातडीने अध्यादेशात रूपांतरित करून दोषींवर कायद्यानुसार कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
पत्रकार परिषदेला मधुसूदन पाटील महाराज, ह.भ.प. बब्रुवान शेंडगे पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप, ह.भ.प. बाळासाहेब पाटील, महेश सावंत आदी उपस्थित होते.

Scroll to Top