सातारा(अजित जगताप) : सातारा तालुक्यातील देगाव (पाटेश्वर) गावात जलजीवन मिशन अंतर्गत भ्रष्टाचाराची गळती होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ मच्छिंद्र आनंदराव घाडगे यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत केला आहे. याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय किंवा सीबीआय मार्फत चौकशी करण्याची ही मागणी केली आहे. सातारा येथे पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र आनंदराव घाडगे यांनी सांगितले की, देगाव गावात पाणीपुरवठा योजनेसाठी ग्रामस्थांनी कोणतीही मागणी केली नव्हती. गावामध्ये अतिरिक्त पाणी येत असल्यामुळे ग्रामस्थांनी लोकवर्गणी काढावी. यासाठी प्रयत्न सुरू झालेला आहे. या योजनेच्या मंजुरीसाठी ग्रामसभेचे चित्रीकरण करून त्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन उपविभाग क्रमांक दोन सातारा यांच्या कार्यालयात शाखा अभियंता यांच्याकडे चित्रीकरण सादर करावी लागते. तसे कोणतेही चित्रीकरण ग्रामसभेचे केलेले नाही. असाही श्री. घाडगे यांनी दावा केला आहे. सदरची खर्चिक योजना ग्रामस्थांच्या माथी मारली जात आहे. या योजनेच्या पाण्यापेक्षाही त्याच्या टक्केवारीवर गाव टग्यांचे लक्ष आहे. सदर योजनेसाठी चांगल्या पद्धतीचा देगाव अंतर्गत रस्ता खोदून ग्रामस्थांची गैरसोय केलेली आहे. त्याचा स्थानिक ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. शासनाच्या धोरणानुसार सदरची योजना डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे बंधन असताना अद्यापही सव्वा ते दीड वर्ष होऊनही योजनेचे काम पूर्ण झालेले नाही. निधीचा अपहर झालेला आहे. जल योजना पूर्ण झाली नसली तरी ग्रामस्थांकडे नळ जोडणी साठी पैशाची मागणी केली जात आहे. वास्तविक पाहता ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी जल जीवन मिशन योजना कार्यान्वित केले आहे. लोक वर्गणीतून दहा टक्के रक्कम जमा करावी लागते. परंतु , देगावात एक कोटी तीस लाख रुपये लोक वर्गणी न काढता दहा टक्के रक्कम जमा करण्यात आलेली आहे. मग एवढी रक्कम जमा करणारे दानशूर कोण आहेत ? याचा ग्रामपंचायतीने खुलासा करावा. जर मी गावाची बदनामी करत असेल तर माझ्यावर अब्रू नुकसानचा दावा दाखल करावा. असे आव्हान श्री मच्छिंद्र घाडगे यांनी केले आहे. देगाव ग्रामस्थ कष्टाने जगत आहेत. त्यांच्यावर जबरदस्तीने नळ जोडणीसाठी पठाणी वसुली केल्यास कायदा व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल. त्याची जबाबदारी शासनाची राहील. असेही ठणकावून सांगितले आहे. कोणत्याही प्रकारची माहिती सार्वजनिक न करता देगाव ग्रामपंचायत, जीवन प्राधिकरण आणि ठेकेदार यांचा भ्रष्टाचारासाठीच त्रिवेणी संगम झालेला आहे. सदर योजनेसाठी आय.एस.आय. मार्कचे साहित्य पुरवले गेलेले नाही. देगाव ग्रामस्थांना संपूर्ण माहिती पारदर्शकरित्या उपलब्ध करूनच निर्णय घ्यावा. असे श्री मच्छिंद्र घाडगे यांनी सुचित केले आहे. गाळ मुक्त धरण व गाळमुक्त शिवार किती लोकांना अनुदान प्राप्त झाले? तसेच गावातील सैनिक भवन बांधकाम आणि लहान मुलांच्या खेळण्याचे साहित्य तसेच अतिक्रमणाचाही उल्लेख त्यांनी केला आहे. देगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये बी.व्ही.जी. इंडिया कंपनीने रस्ता अडवून ठेवलेला आहे. तो ही खुला करावा. देशभर स्वच्छतेचे काम करणाऱ्या या कंपनीने देगाव गावात घाण करू नये. अशी त्यांनी जोरदार मागणी केली आहे. …………………….. . फोटो- देगाव जल जीवन मिशन योजनेची माहिती देताना मच्छिंद्र घाडगे




