ताज्या बातम्या

दहा वर्षे सेवा, तरीही मागण्या प्रलंबित; १,६७५ कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानात आंदोलन

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागात राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत गेल्या दहा वर्षांपासून सेवा बजावणाऱ्या १,६७५ कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन केले. डी.एस. इंटरप्रायजेस या कंपनीमार्फत डॉक्टर, नर्स, फार्मसी, लॅब टेक्निशियन, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि अटेंडंट या पदांवर हे कर्मचारी कार्यरत आहेत.
गेल्या दशकभरापासून आरोग्य विभागात महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असूनही त्यांच्या मूलभूत मागण्यांकडे अद्याप गांभीर्याने पाहिले गेले नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. त्यामुळे शासन व महापालिका प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
आंदोलनादरम्यान दीपक चव्हाण, प्रतीक्षा भागवत, प्रवीण चव्हाण, गिरीश सुर्वे, रेश्मा कोचले, परेश मटकर, प्रणाली जठार, माया केदार, हिरामण बनगारे यांच्यासह महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांची माहिती दिली.
कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये वार्षिक वेतनवाढ लागू करणे, भरपगारी प्रसूती रजा देणे, सानुग्रह अनुदान अर्थात दिवाळी बोनस देणे, भविष्य निर्वाह निधी (पीएफ) व कर्मचारी राज्य विमा योजना (ईएसआयसी) लागू करणे तसेच वार्षिक सुट्ट्या देणे यांचा समावेश आहे.
याशिवाय ठेकेदारी पद्धत रद्द करून कर्मचाऱ्यांचा शासकीय सेवेत समावेश करावा, ‘स्पर्श’ प्रणालीच्या माध्यमातून वेतन अदा करावे, बाह्यस्रोत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी स्वतंत्र विधेयक सभागृहात मांडावे आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करावी, अशा मागण्याही आंदोलनकर्त्यांनी केल्या.
दहा वर्षांपासून आरोग्य विभागात सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा शासन व महापालिका प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.

Scroll to Top