ताज्या बातम्या

विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीचा स्वच्छतेसाठी पुढाकार; ओला-सुका कचरा वर्गीकरणासाठी डस्टबिन वाटप

कराड : गावातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ग्रामपंचायत विठ्ठलवाडीच्या वतीने ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करण्यासाठी डस्टबिनचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामस्थांना घरातूनच कचऱ्याचे वर्गीकरण करण्यास प्रोत्साहन मिळणार असून, गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यास मदत होणार आहे.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश ओला व सुका कचरा स्वतंत्र ठेवणे हा आहे. ओला कचरा स्वतंत्रपणे संकलित करून त्यापासून खतनिर्मिती करण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे, तर सुका कचरा वेगळा करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन झाल्यास गावातील स्वच्छता, पर्यावरण आणि नागरिकांचे आरोग्य यामध्ये सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होणार आहे.

यावेळी ग्रामपंचायत अधिकारी सचिन दुर्गावळे, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, ग्रामरोजगार सहाय्यक तसेच विठ्ठलवाडी गावातील नागरिक उपस्थित होते.

ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडून देण्यात आलेल्या डस्टबिनचा योग्य वापर करून कचरा रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी न टाकता ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे द्यावा, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले.

“ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा; स्वच्छ विठ्ठलवाडीचा संकल्प!” या संदेशातून स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी विठ्ठलवाडी घडविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Scroll to Top