सातारा(अजित जगताप) : संस्कार भारती जिल्हा समिती सातारा यांच्या वतीने प्रसिद्ध लेखक व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार आणि शंकर पाटील यांच्या जन्मशताब्दी निमित्त नवोदित तसेच महाविद्यालयीन लेखकांसाठी कथालेखन ,कथाकथन कार्यशाळेचे शनिवारी दिनांक २९ ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले आहे.
कथा लेखनाचा आकृतीबंध तसेच कथेचे सादरीकरण या विषयावर कार्यशाळेत मार्गदर्शन केले जाणार आहे.
कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदचे अध्यक्ष योगेश सोमण आणि सुप्रसिद्ध लेखक , अभिनेते प्रमोद पवार उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या लेखन संदर्भातील भवितव्य व कथाकथन या सादरीकरण प्रकारातील कौशल्य वाढवण्यासाठी भविष्यात उपयोगी पडणार आहे. छत्रपती शाहू सभागृह कला व वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, सातारा शहर दुपारी दोन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ही कार्यशाळा होणार आहे.
कार्यशाळेसाठी प्रवेश शुल्क प्रति व्यक्ती शंभर रुपये आहे.
कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी
मुकुंद फडके 9552593297,
संजीव आरेकर 8149912687,
दिलीप चरेगावकर 9921958042 ,
रसिका केसकर 9420630374
यांच्याशी गुरुवार दिनांक २७ ऑगस्ट पर्यंत संपर्क साधावा असे आवाहन संस्कार भारतीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चरेगावकर यांनी केले आहे. संस्कार भारती ही भारतीय कला, ललित कला, साहित्य आणि संस्कृतीचे संवर्धन व प्रोत्साहन देण्यासाठी एक अखिल भारतीय संघटना आहे. याची स्थापना १९८१ मध्ये लखनौ येथे झाली. भाऊराव देवरस, हरिभाऊ वाकणकर आणि बाबा योगेंद्र यांनी सहभाग घेतला होता. ‘सा कला या विमुक्तये’ (जी कला बंधनातून मुक्त करते) हे या संस्थेचे मुख्य सूत्र आहे.प्रमुख कार्य आणि वैशिष्ट्येविविध कलाक्षेत्रे: संगीत, नृत्य, नाटक, चित्रकला, शिल्पशास्त्र, साहित्य आणि लोककला या क्षेत्रांच्या विकासासाठी ही संस्था काम करते. कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी देशभरात विविध कला शिबिरे, प्रदर्शन आणि सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन केले जाते.संस्कार भारती रांगोळी: सुंदर, मोठे व आकर्षक रंग वापरून काढली जाणारी ‘संस्कार भारती रांगोळी’ ही देशभरात अत्यंत लोकप्रिय असलेली रांगोळीची विशेष शैली या संस्थेच्या माध्यमातून रुजली आहे. देशभरात या संस्थेच्या हजारो शाखा कार्यरत असून नवीन पिढीत भारतीय संस्कृतीबद्दल जाणिवा निर्माण करण्याचे काम सुरू आहे. संस्कार भारती सातारा समितीमार्फत विधायक उपक्रम राबवण्यात येतात.




