ताज्या बातम्या

मंचरमध्ये बनावट सिंथेटिक दूध रॅकेटचा पर्दाफाश; २६ जणांविरुद्ध गुन्हा, हजारो किलो साठा जप्त

पुणे : अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी ४ व ५ जुलै २०२६ रोजी संयुक्त कारवाई करत मंचर (ता. आंबेगाव) येथे कथित बनावट व सिंथेटिक दूध तयार करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात ५ जुलै रोजी २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास वेगाने सुरू आहे.
एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कारवाईत मंचर येथील नवकार डिस्ट्रीब्यूटर्समधून दुधात भेसळ करण्यासाठी वापरली जाणारी विविध रसायने, पावडर व डिटर्जंटचा सुमारे १,३८५ किलो साठा जप्त करण्यात आला. तसेच पिंपळगाव खडकी येथील जय श्रीराम डेअरी फार्मवरून २,७६७ किलो कथित सिंथेटिक दूध जप्त करून ते नष्ट करण्यात आले.
प्राथमिक तपासानुसार, दुधातील प्रोटीन, एसएनएफ आणि फॅटचे प्रमाण कृत्रिमरीत्या वाढवण्यासाठी व्हे पावडर, स्किम्ड मिल्क पावडर, खाद्य तेल तसेच मिश्रण एकसंध करण्यासाठी डिटर्जंट, शॅम्पू आणि इमल्सिफायरचा वापर केल्याचा संशय आहे. जप्त नमुने शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, अंतिम अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
या प्रकरणात सुशांत बबनराव हिंगे, संदीप कांतीलाल लोढा, हेमंत टेके, संजोग यादव, ठकसेन रखमाजी आरगडे आणि राजू दगडू तांबडे यांच्यासह एकूण २६ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तपासादरम्यान या रॅकेटचे जाळे पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या जिल्ह्यांपर्यंत पसरले असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. वितरण साखळी, आर्थिक व्यवहार, जीएसटी नोंदी, यूपीआय व्यवहार आणि मोबाईल कॉल रेकॉर्डची तपासणी सुरू असून, संबंधित दुधाचा पुरवठा नेमका कुठे झाला याचाही शोध घेतला जात आहे.
दरम्यान, एफडीएच्या या कारवाईचे विविध शेतकरी संघटना आणि नागरिकांनी स्वागत केले असून, अन्नभेसळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

Scroll to Top