ताज्या बातम्या

विद्युत प्रवाहने खामगावच्या शिंदेंच्या जीवनात अंधार. शॉक लागून चार जण गतप्राण..

फलटण(अजित जगताप) : संपूर्ण महाराष्ट्राला प्रकाशमान करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील खामगाव तालुका फलटण या ठिकाणी विद्युत प्रवाहने शिंदे कुटुंबीयांच्या जीवनात अंधार पसरला. पहाटेच्या वेळेला बल्ब लावताना शॉक लागून चार जण गतप्राण झाल्याची दुर्दैवी घटना घडली. नातेवाईकांचा आक्रोश आणि मुर्दाड प्रशासन व वीज वितरण कंपनीचा गलथान कारभार जबाबदार असलची टीका होऊ लागलेली आहे.

फलटण तालुक्यातील खामगाव येथील एका खाजगी इंग्लिश मीडियम शाळेजवळ झोपडी वजा पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या शिंदे कुटुंबावर आज पहाटे काळाने कायमचाच अंधार केला आहे. बुधवारी दिनांक आठ जुलै रोजी पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडलेल्या एका विद्युत वायरमध्ये अचानक वीजप्रवाह उतरला होता. ते कुणाचेही लक्षात आले नाही. याच दरम्यान, शिंदे कुटुंबातील प्रमुख पिसुरड्या किसन शिंदे (वय ४८) हे बाहेर आले असता, त्यांचा विद्युत प्रवाह असणाऱ्या वायरला स्पर्श झाला आणि त्यांना विजेचा तीव्र झटका बसला. त्यामुळे ते जमिनीवर कोसळले.

पहाटेच्या वेळी झोपेतून जागे झालेल्या पतीला विजेचा धक्का लागल्याचे पाहून त्यांना वाचवण्यासाठी पत्नी गंगुबाई पिसुरड्या शिंदे (वय ४६) या पुढे सरसावल्या, त्यांनाही विद्युत प्रवाहाचा झटका बसला. आई-वडिलांना मृत्यूच्या दारात पाहून त्यांना वाचवण्यासाठी मुलगा सचिन पिसुरड्या शिंदे (वय २६) आणि मुलगी आरती पिसुरड्या शिंदे (वय २२) यांनीही विद्युत प्रवाह असलेली वायर बाजूला काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, नियतीला काही वेगळेच मान्य होते. विजेचा प्रवाह इतका भयानक होता की, एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात कुटुंबातील हे चारही सदस्य गतप्राण झाले.

या घटनेची माहिती खामगाव परिसरात पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. विद्युत प्रवाह बंद करून प्राण वाचवण्याचा भाबडा प्रयत्न केला. परंतु सर्वजण प्रवाहाच्या झटक्याने जागीच गतप्राण झाले होते. घटनेची गांभीर्य ओळखून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी महादेव पिसे, ओंबासे आणि अडसूळ यांनी तात्काळ खामगाव येथील घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी फलटण उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिले. यावेळी नातेवाईकांचा आक्रोश पाहून अनेकांचे डोळे पाणवले. खामगाव येथे अनेक कुटुंबीय गरिबीचे चटके सहन करत जगत होते.

फलटण तालुक्यातील महावितरण कंपनीच्या गलथानपणामुळे हा अपघात घडला की अन्य काही तांत्रिक कारणांमुळे घराबाहेरील वायरमध्ये वीजप्रवाह उतरला. याचा सखोल चौकशी व तपास फलटण ग्रामीण पोलीस आणि विद्युत विभागाचे अधिकारी करीत आहेत. शिंदे कुटुंबीय कायमचे उध्वस्त झाले आहेत.अचानक विद्युत प्रवाह वायर मध्ये आल्यामुळे घरातील कर्त्या पुरुषासह तरुण सुद्धा मृत्युमुखी पडल्यामुळे या घटनेची सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, पावसाळ्यामध्ये विद्युत प्रवाह असलेल्या वायर पासून लोकांनी दूर राहावे. आपल्या स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घ्यावी असे आता नम्रपणाने लोक एकमेकांना सांगत आहेत.

—————————————–

फोटो- खामगाव तालुका फलटण येथे विद्युत प्रवाहामुळे शिंदे कुटुंबातील चार सदस्य झाले गतप्राण

Scroll to Top