ताज्या बातम्या

शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानसाठी मुंबईत कार्यालयाच्या जागेची मागणी; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना निवेदन

मुंबई : शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मुंबईमध्ये संस्थेच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. या अनुषंगाने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा कोयना रत्न राजाराम बुवा शेलार यांनी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत येणाऱ्या संस्थेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्यांना बैठक, समन्वय आणि प्रशासकीय कामकाजासाठी कायमस्वरूपी कार्यालयाची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. त्यामुळे मुंबईत संस्थेसाठी योग्य जागा उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती करण्यात आली.
यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी निवेदनाची दखल घेत संस्थेच्या मागणीबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. “नियमांच्या चौकटीत राहून संस्थेला कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करेन,” असे आश्वासन त्यांनी राजाराम बुवा शेलार यांना दिले.
या भेटीमुळे शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, मुंबईत लवकरच संस्थेला स्वतंत्र कार्यालयाची जागा उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Scroll to Top