कराड | कराड येथील कॉटेज हॉस्पिटलसमोरील फुटपाथवर वाढलेल्या अतिक्रमणामुळे रुग्ण, नातेवाईक, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि शालेय विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. पादचाऱ्यांसाठी राखीव असलेला फुटपाथ हातगाड्या, फेरीवाले आणि विविध व्यावसायिकांच्या अतिक्रमणामुळे व्यापला गेला असून नागरिकांना जीव मुठीत धरून मुख्य रस्त्यावरून चालावे लागत आहे.
रुग्णालयात दररोज शेकडो नागरिक उपचारासाठी येत असतात. मात्र, फुटपाथ मोकळा नसल्याने रुग्णवाहिका, इतर वाहने आणि पादचारी यांच्यात गोंधळ निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे.
स्थानिक नागरिकांनी संबंधित नगरपालिका आणि प्रशासनाने तातडीने अतिक्रमण हटवून फुटपाथ नागरिकांसाठी खुला करावा, अशी जोरदार मागणी केली आहे. अतिक्रमण हटविल्यानंतर पुन्हा ते होऊ नये यासाठी नियमित तपासणी आणि कठोर कारवाई करण्याचीही मागणी होत आहे.
प्रशासनाला नागरिकांचे सवाल :
फुटपाथ पादचाऱ्यांसाठी की अतिक्रमणासाठी?
हॉस्पिटल परिसरातील अतिक्रमणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का?
अपघात झाल्यानंतरच कारवाई होणार का?




