ताज्या बातम्या

संजय गांधी निराधार लाभार्थ्यांची तहसील कार्यालयात धावपळ; अतिरिक्त कागदपत्रांच्या मागणीवरून संभ्रम, प्रशासनाकडून स्पष्टीकरणाची अपेक्षा

कराड(प्रताप भणगे) : कराड तहसील कार्यालयामार्फत संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकडून कागदपत्र पडताळणीच्या प्रक्रियेत जॉब कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र तसेच फॉर्म 26AS संदर्भातील कागदपत्रे सादर करण्यास सांगितले जात असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे वृद्ध, निराधार, विधवा, दिव्यांग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभार्थ्यांना विविध कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागत असून त्यांच्यात नाराजीचे वातावरण आहे.
लाभार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, काही प्रकरणांमध्ये फॉर्म 26AS संदर्भातील कागदपत्रे सनदी लेखापाल (CA) यांच्याकडून मिळवून आणण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे अतिरिक्त खर्च, वेळ आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार लाभार्थ्यांनी केली आहे. अनेकांना या कागदपत्रांची आवश्यकता नेमकी कशासाठी आहे, याची स्पष्ट माहितीही देण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
यामुळे लाभार्थ्यांनी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. जॉब कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र आणि फॉर्म 26AS यांसारख्या कागदपत्रांची मागणी कोणत्या शासन निर्णय (GR) किंवा परिपत्रकाच्या आधारे केली जात आहे? ही कागदपत्रे सर्व लाभार्थ्यांसाठी अनिवार्य आहेत का? तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभार्थ्यांना सीएकडून कागदपत्रे काढण्याची आवश्यकता का निर्माण झाली आहे, याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
लाभार्थ्यांचे म्हणणे आहे की, आवश्यक कागदपत्रांची अधिकृत यादी, संबंधित शासन आदेश आणि पडताळणी प्रक्रियेबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना सार्वजनिक केल्यास नागरिकांचा संभ्रम दूर होईल आणि अनावश्यक धावपळ टळेल. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर कराड तहसील प्रशासनाने अधिकृत स्पष्टीकरण देण्याची अपेक्षा लाभार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Scroll to Top