कराड(प्रताप भणगे) : मौजे किवळ (ता. कराड) येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प कराड-१ अंतर्गत मसूर बीटमधील गंमत-जंमत शिबिराचा सांगता समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या सौ. संगिता साळुंखे (माई) तर अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच प्रदीप काशिद उपस्थित होते.
यावेळी उपसरपंच प्रभाकर पवार, माजी उपसरपंच कैलास साळुंखे, माजी उपसरपंच राजेश साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य सचिन साळुंखे, ग्रामपंचायत सदस्या आशा पावशे, पार्वती जाधव, मनीषा साळुंखे यांच्यासह अंगणवाडी सेविका, मदतनीस, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समारंभात सौ. संगिता साळुंखे (माई) यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा सन्मान करून त्यांना छत्री भेट देण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना संगिता साळुंखे (माई) म्हणाल्या, “बालकांचे शिक्षण, संस्कार आणि सर्वांगीण विकास हा समाजाच्या प्रगतीचा भक्कम पाया आहे. अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि सामाजिक जाणीव विकसित होते. अंगणवाडी सेविका व मदतनीस या बालविकासाच्या कार्यातील खऱ्या अर्थाने आधारस्तंभ असून त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे.”
कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी उत्कृष्टरीत्या केले. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा शैक्षणिक व संस्कारक्षम उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.




