ताज्या बातम्या

स्मार्ट मीटरविरोधात कराडमध्ये वीज ग्राहकांचा भव्य निषेध मोर्चा; संग्राम बाबा पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

कराड(प्रताप भणगे) : राज्यात सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेविरोधात कराड येथे वीज ग्राहकांनी भव्य निषेध मोर्चा काढून तीव्र आंदोलन केले. कराड पंचायत समिती सदस्य संग्राम बाबा पवार यांच्या नेतृत्वाखाली विजयनगर येथील महावितरण कार्यालयापासून मुख्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयापर्यंत घोषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील, पंचायत समिती सदस्य सिद्धार्थ चव्हाण, प्रताप चव्हाण, रवींद्र बडेकर, सामाजिक कार्यकर्ते उमर सय्यद, सतीश पानुगाडे, उपसरपंच अजित जाधव, आनंदराव लाडे, अनिल बापू घराळ, अमोल कणसे, महेश निकम, विद्याधर गायकवाड यांच्यासह विविध गावांतील सरपंच, उपसरपंच, शेतकरी व वीज ग्राहक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
स्मार्ट मीटरमुळे वीज ग्राहकांवर आर्थिक भार वाढण्याची शक्यता असून ग्राहकांची संमती न घेता मीटर बसविणे अन्यायकारक असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. विनापरवाना बसवलेले स्मार्ट मीटर काढून जुने मीटर पुन्हा बसवावेत, तसेच थकीत बिलासाठी थेट मीटर काढून घेण्याची पद्धत बंद करावी, अशी मागणी करण्यात आली.
कराड पंचायत समितीने स्मार्ट मीटरविरोधात मंजूर केलेल्या ठरावाची तातडीने दखल घ्यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनाच्या शेवटी महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तसेच २२ जून २०२६ रोजी कराड तालुक्यात आणखी भव्य मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली.

Scroll to Top