ताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पेणमध्ये मुलांसाठी ‘छत्री पेंटिंग व रंगसंगती’ कार्यशाळा… पद्मश्री अच्युत पालव यांचे मार्गदर्शन; सुहित जीवन ट्रस्टचा ‘अक्षमतेकडून सक्षमतेकडे’ उपक्रम

पेण : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सुहित जीवन ट्रस्ट, पेण संचलित सुमंगल मतिमंद मुलांची शाळा आणि एकलव्य व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र (कार्यकुशलता) यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष मुलांसाठी ‘छत्री पेंटिंग व रंगसंगती’ या अनोख्या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘अक्षमतेकडून सक्षमतेकडे’ या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम विशेष मुलांच्या सर्जनशीलतेला चालना देणारा ठरणार आहे.
या कार्यशाळेचे प्रमुख आकर्षण म्हणजे पद्मश्री पुरस्कार विजेते आणि जागतिक कीर्तीचे सुलेखनकार अच्युत पालव यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन. त्यांच्या प्रेरणादायी सहवासातून विद्यार्थ्यांना रंग, रेषा, कल्पकता आणि कलात्मक अभिव्यक्तीची नवी दिशा मिळणार असून, त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळणार आहे.
विशेष मुलांमध्येही अमर्याद सर्जनशीलता आणि कर्तृत्व दडलेले असते. योग्य संधी, प्रेम आणि प्रोत्साहन मिळाल्यास ही मुले समाजात स्वबळावर वेगळी ओळख निर्माण करू शकतात, या विश्वासातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. छत्री या दैनंदिन वापराच्या वस्तूला विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचा कॅनव्हास बनवत त्यांना रंगांच्या माध्यमातून स्वतःच्या भावना व्यक्त करण्याची संधी दिली जाणार आहे.
सुहित जीवन ट्रस्ट गेल्या अनेक वर्षांपासून विशेष मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असून, कला, संस्कार, व्यावसायिक प्रशिक्षण आणि सामाजिक सहभाग यांच्या माध्यमातून त्यांना आत्मनिर्भर बनविण्याचा प्रयत्न करत आहे. समाजाने या मुलांकडे त्यांच्या अक्षमतेपेक्षा त्यांच्या क्षमतांच्या दृष्टीने पाहावे, हा या उपक्रमामागील मुख्य संदेश आहे.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात येणार असून, पावसाळ्यात त्यांच्या सुरक्षिततेची आणि आरोग्याची काळजी घेण्याचाही संस्थेचा संवेदनशील प्रयत्न आहे.
विशेष मुलांच्या चेहऱ्यावर उमटणारे निरागस हास्य, त्यांच्या मनात निर्माण होणारा आत्मविश्वास आणि समाजाकडून मिळणारी आपुलकी हीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्तची सर्वात अर्थपूर्ण भेट ठरेल. त्यामुळे हा उपक्रम केवळ एक कार्यशाळा न राहता, संवेदनशीलता, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा उत्सव ठरणार आहे.

Scroll to Top