मुंबई : (खंडूराज गायकवाड) : राज्याच्या सांस्कृतिक चळवळीला दिशा देणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातील संचालकपद गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त असल्याने सांस्कृतिक वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या महत्त्वाच्या पदावर नेमकी कोणाची नियुक्ती होणार, याचा अंतिम निर्णय मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरूनच होणार असल्याची माहिती विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. दरम्यान, या पदासाठी चार ते पाच अधिकाऱ्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू असल्याचेही समोर आले आहे.
एप्रिल २०२६ अखेरीस तत्कालीन संचालक बिभीषण चवरे यांनी पदभार सोडल्यानंतर हे पद रिक्त झाले. सध्या सहसंचालक श्रीराम पांडे यांच्याकडे प्रभारी स्वरूपात संचालकपदाची जबाबदारी आहे. पूर्णवेळ संचालक नियुक्त करण्यासाठी यापूर्वी सांस्कृतिक कार्य विभागाने जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या पदासाठी अर्ज केले आहेत.
सूत्रांच्या मते, इच्छुक अधिकाऱ्यांपैकी काहींना सांस्कृतिक क्षेत्राचा पुरेसा अनुभव नसतानाही त्यांनी या पदासाठी अर्ज केले आहेत. तर काही अधिकारी सांस्कृतिक, लोककला, नाट्य आणि साहित्य क्षेत्रातील कामाचा अनुभव बाळगून आहेत. मात्र अद्याप कोणत्याही नावावर अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही. किमान आणखी पंधरा दिवस तरी या नियुक्तीबाबत निर्णय होण्याची शक्यता नसल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे, या नियुक्ती प्रक्रियेत सांस्कृतिक कार्यमंत्री कार्यालयाला तुलनेने दूर ठेवण्यात आल्याची चर्चा मंत्रालयीन वर्तुळात आहे. त्यामुळे सहाव्या मजल्यावरून हिरवा कंदील मिळाल्याशिवाय नव्या संचालकाची नियुक्ती होण्याची शक्यता कमी असल्याचे मानले जात आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या माध्यमातून राज्यातील विविध सांस्कृतिक योजना, लोककला संवर्धन कार्यक्रम, शासकीय पुरस्कार, महोत्सव तसेच सांस्कृतिक धोरणांची अंमलबजावणी केली जाते. अशा महत्त्वाच्या विभागाचे सर्वोच्च प्रशासकीय पद दीड महिन्यांपासून रिक्त असल्याने काही निर्णय प्रक्रियांवर परिणाम होत असल्याची चर्चा सुरू आहे.
लोककलावंत, नाट्यकर्मी, साहित्यिक आणि विविध सांस्कृतिक संस्थांच्या प्रतिनिधींनी या पदावर तातडीने नियुक्ती करून विभागाला पूर्णवेळ नेतृत्व द्यावे, अशी मागणी केली आहे. आगामी काळात राज्यभर विविध सांस्कृतिक उपक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणी होणार असल्याने सक्षम नेतृत्वाची गरज अधिक प्रकर्षाने जाणवत आहे.
दरम्यान, नियुक्ती प्रक्रियेबाबत सांस्कृतिक कार्य विभागाने अद्याप अधिकृत भूमिका जाहीर केलेली नसली, तरी लवकरच निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तोपर्यंत मात्र “सांस्कृतिक कार्य विभागातील संचालकपदाचे घोडे मंत्रालयातच अडले आहे का?” हा प्रश्न सांस्कृतिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.




