ताज्या बातम्या

कझाकस्तानमध्ये मराठीचा झेंडा; ‘दिव्य मराठी’च्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने मंगेश चिवटे सन्मानित

अल्माटी (कझाकस्तान), दि.२१ जुलै : कझाकस्तानमधील निसर्गरम्य अल्माटी शहरात ‘दिव्य मराठी’ आयोजित ‘इंटरनॅशनल एक्सेलन्स अवॉर्ड्स २०२६’ हा भव्य पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २५ मान्यवरांचा या आंतरराष्ट्रीय मंचावर गौरव करण्यात आला. लाइफलाईन अॅमेनिटी मीडिया ऑफ पॉवर हे या सोहळ्याचे प्रायोजक होते.
या सोहळ्यात उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांना महाराष्ट्रातील गरजू रुग्णांसाठी केलेल्या उल्लेखनीय आणि सातत्यपूर्ण सेवाकार्यासाठी आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या सन्मानामुळे महाराष्ट्राच्या रुग्णसेवेची दखल जागतिक स्तरावर घेतल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात झाली. सभागृहात ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या घोषणांनी वातावरण दणाणून गेले. राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाला औपचारिक प्रारंभ झाला. कझाकस्तानच्या पारंपरिक वेशभूषेतील कलाकारांनी भारतीय पाहुण्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.
यावेळी स्थानिक कलाकारांनी कझाकस्तानच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणारे पारंपरिक ‘फ्युलत्रा’ लोकनृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. महाराष्ट्रातील मान्यवर आणि स्थानिक कलाकारांमधील सांस्कृतिक संवादामुळे कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय मैत्रीची अनोखी झळाळी लाभली.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना मंगेश चिवटे म्हणाले, “महाराष्ट्रातील गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचवण्याच्या आमच्या प्रयत्नांची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली, याचा मनस्वी आनंद आहे. या सन्मानामुळे माझी जबाबदारी आणखी वाढली असून, यापुढेही अधिक निष्ठेने, संवेदनशीलतेने आणि तत्परतेने रुग्णसेवा करण्याचा माझा निर्धार आहे.”
कझाकस्तानमध्ये पार पडलेल्या या सोहळ्याने मराठी संस्कृतीचा आणि महाराष्ट्रातील सेवाभावी कार्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव करत मराठीचा झेंडा अभिमानाने फडकविला.

Scroll to Top