प्रतिनिधी : मुंबईसह उपनगरात दडी मारलेल्या पावसाने आज दमदार हजेरी लावली. त्यामुळे उष्म्याने हैराण झालेल्या लोकांना थोडा दिलासा मिळाला. आज सकाळपासून मुंबई, ठाणे, भिवंडी, नवी मुंबईसह पालघरमध्ये पावसाची संततधार बरसली. याचा रेल्वेसह रस्ते वाहतुकीवर परिमाण झाला. भिवंडी, नवी मुंबई आणि पालघरमधील सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने पुढील काही दिवस कोकणाला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
राज्यातील अनेक शहरांत आज जोरदार पाऊस झाला. मुंबई परिसरात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूकर कलमडली.जनजीवनाला फटका बसला. पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे देहर्जे नदीवरील पूल पाण्याखाली गेला. त्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. भिवंडी शहरातील बाजारपेठेत पाणी साचले होते. याचा भाजीविक्रेत्यांना मोठा फटका बसला. तसेच कल्याण डोंबिवलीत सकाळपासून मुसळधार पाऊस पडत होता. यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झाली. कल्याण पूर्वेकडील पीसवली गावातील श्री कॉलनी ज्योतिर्लिंग कॉलनी, धनश्री कॉलनी जलमय झाली होती. ठाण्यातदेखील पावसाच्या जोरदार सरी बरसात होत्या. यामुळे काही भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर शहरात नदी, नाले ओसंडून वाहत होते.
ठाणे-पालघर या दोन जिल्ह्यांना तसेच मुंबई-आग्रा आणि मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गाना जोडणारा मनोर वाडा- भिवंडी या राज्यमार्गावर पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. यासोबत ठाणे-नाशिक महामार्गावरदेखील वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रस्ते वाहतुकीसह लोकल सेवेवरदेखील परिमाण झाला होता. ठाण्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेन उशिराने, तर विरारहून चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या गाड्या संथगतीने धावत होत्या. यामुळे मुंबईत कामाला जाणाऱ्या नोकरदारांना कार्यालय गाठण्यास उशीर झाला.