
प्रतिनिधी : १९१२ साली बांधण्यात आलेल्या ब्रिटिशकालीन सायन रोड उड्डाणपुलावरून आता अवजड वाहनांच्या वाहतुकीला शुक्रवार-शनिवारच्या मध्यरात्रीपासून बंदी घालण्यात आला आहे. मध्य रेल्वेने सुरक्षेचा उपाय म्हणून सायन रोड उड्डाणपुलावर अवजड वाहनांना प्रतिबंध करण्याचा प्रस्ताव दिला.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमध्ये सायन रोड उड्डाणपुलाला असुरक्षित घोषित केले. मध्य रेल्वे मार्गावरील नवीन पूल बांधण्याबाबत सातत्याने हालचाली सुरु झाल्या होत्या. मात्र, स्थानिकांनी केलेल्या विरोधानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी रेल्वे प्रशासनाची भेट घेतली आणि त्यांनी दहावी, बारावीच्या परीक्षा आणि इतर बाबी लक्षात घेऊन पुलाचे काम पुढे ढकलावे, अशी विनंती केली होती. त्यामुळे पूल पाडकामाची तारीख पुढे ढकलली गेली. मध्य रेल्वे मार्गावरील पाचव्या, सहाव्या लाइनच्या कामासह अत्यंत जुन्या झालेल्या सायन पुलाच्या जागी नवा पूल बांधला जाणार आहे. मध्य रेल्वे आणि महापालिका यासाठी एकत्र काम करणार आहे.