स्वातंत्रपूर्व काळात इंग्रजांची सत्ता आणि स्वातंत्र्य लढयासाठी जीवघेणा संघर्ष सुरु होता. यावेळी समाजाच्या सर्वांगिण उन्नतीसाठी ना परकीयांचे कार्य ना स्वकियांच्या प्रयत्नांना यश येत होते. त्यात जात, धर्माचा भेदभाव टोकाचा तर शिक्षणाचा अभाव असलेल्यांच्या जीवनाची दशा दिशाहीन झाली होती. या काळात शिक्षणाच्याप्रवाहात नसलेल्या बहुजन समाजाला जीवनमान उंचावण्यासाठी शिक्षण हा सर्वोत्तम पर्याय आहे. १०६ वर्षापूर्वी हे पटवून देत, ‘ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा,’ असा ज्ञानदानाचा पवित्र वसा घेऊन महाराष्ट्रातील खेडया पाडयात अनवाणी भटकंती करणाऱ्या महामानव पद्यभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची शुक्रवार दि. ९ मे रोजी ६६ वी पुण्यतिथी साजरी होत आहे. शिक्षणातून समाज परिवर्तन होऊ शकते, या विश्वासावर कर्मवीर अण्णंनी रयत शिक्षण संस्थेच्या कार्यास सुरुवात केली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील खेडयापाडयातून भटकंती करुन सुरुवातीस गुणी मुले शोधून त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी कर्मवीर अण्णा घेत गेले. यातून माणसाची अस्मिता फुलवत, मनामनात स्वाभिमान जागवत, मनगटातील ताकतीची जाणिव करुन देत शिक्षणाचा संस्कार देणारी महाराष्ट्रभर ज्ञान मंदिरे उभे करण्याचे महान कार्य त्यांनी केले. स्वतःचे आयुष्य शिक्षणाच्या कार्याला समर्पित करणाऱ्या कर्मवीर अण्णांना रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या निस्सिम त्यागाची समर्थ साथ लाभली. शिक्षण घेण्याची इच्छा आहे, पण परिस्थिती नाही. अशांना ‘कमवा व शिका’ योजनेचा पर्याय देऊन , हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणघेण्याची संधी उपलब्ध केली.
कर्मवीरांनी ध्येयवादातून १९१९ मध्ये रयत शिक्षण संस्थेची काले (कराड) येथे पहिले वसतिगृह सुरु करुन झालेल्या शैक्षणिक कार्याच्या वटवृक्षाच्या आता २०२५ मध्ये १०६ वर्षात तब्बल ७३७ शाखांच्या कक्षांचा विस्तार झाला आहे. भविष्याचा वेध घेत विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर आकलन क्षमता, आत्मविश्वास, तर्क संगती, बुध्दी चातुर्य, स्मरणशक्ती, समय सूचकता, निरीक्षण क्षमता, निमिर्ती कौश्यल्य, वैज्ञानिक दृष्टीकोन, संशोधक वृत्ती, डिजीटल शिक्षण पध्दत, गुरुकुल शिक्षाणासारख्या नवनविन शैक्षणिक प्रयोगांची जोड दिली आहे. यातूनअध्यापन आणि अध्ययनात उपयुक्त बदलासह विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ, सर्वांगीण विकास, परिपूर्ण शिक्षणासाठी ते यशस्वी ठरत आहेत.
आज आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आणि लोकशाही पध्दतीने कारभार होत असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या कार्याचा लौकिक आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचला आहे. राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विविध संस्थांकडून या कार्याची दखल घेऊन अनेक पुरस्कार, शैक्षणिक कार्याला पाठबळ मिळत आहे. देशाच्या प्रगतीला योगदान देणारा सक्षम नागरिक निर्माण करण्यासाठी रयत शिक्षण संस्थेचे मोठे योगदान असून कर्मवीर अण्णा आणि रयत माऊलींनी रोवलेला शिक्षण रूपी वटवृक्षाच्या कक्षा प्रचंड रुदावल्या असून त्या बहरल्या सुध्दा आहेत.
कर्मवीर अण्णांची शुक्रवार दि. ९ मे रोजी रोजी पुण्यतिथी रयत परिवाराकडून साजरी होत आहे. स. ८:३० वाजता कर्मवीरांच्या समाधीला अभिवादन करून संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थित पुण्यतिथी कार्यक्रम होत आहे. कर्मवीरांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे.
प्राचार्य विजय जाधव
पंचायत राज प्रशिक्षण केंद्र वर्ये-सातारा