मुंबई : महाराष्ट्रात उन्हाळा तीव्र होत असताना राज्यातील पाणीटंचाई गंभीर होत चालली आहे. ग्रामीण तसेच शहरी भागात लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागू नये यासाठी राज्य सरकारने सज्जता दाखवली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
या बैठकीत त्यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नगरपालिकांच्या मुख्य अधिकाऱ्यांना फिल्डवर जाऊन पाण्याची सद्यस्थिती जाणून घेण्याचे आदेश दिले. टंचाईग्रस्त भागांमध्ये तत्काळ उपाययोजना करण्याचे आणि १५ जुलैपर्यंत पाणीसाठा पुरेल असे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.
शिंदे म्हणाले, “लोकांना त्रास होऊ नये, त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी धावपळ करावी लागू नये यासाठी प्रशासनाने डोळ्यात तेल घालून काम करावे. प्रत्येक जिल्ह्यात किती टँकर सुरू आहेत, आणि मागील वर्षी काय परिस्थिती होती, याचा बारकाईने आढावा घ्या.”
या बैठकीला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, ग्रामविकास प्रधान सचिव एकनाथ डवले, नगरविकास प्रधान सचिव डॉ. गोविंदराज आणि पाणीपुरवठा प्रधान सचिव संजय खंदारे यांची उपस्थिती होती.
राज्य सरकारकडून गंभीर उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर घेतलेले हे पाऊल नागरिकांना दिलासा देणारे ठरणार आहे. प्रशासनाचे आता खरे कस लागणार आहे!