“गुरूने दिला ज्ञान रुपी वसा,
आम्ही चालवू हा पुढे वारसा”
या काव्य पंक्तीप्रमाणे आपल्या लाडक्या आजोबांचा आणि आई – वडिलांचा वारसा अंबरनाथच्या राजकारण, समाजकारण आणि सूर्योदय सोसायटीच्या कामात पुढे चालवणारी, अंबरनाथ की बेटी, आमची लाडकी ताई श्रीमती शोभा प्रभाकर शेट्टी अर्थात शोभा विष्णू सरदार या आपल्या वयाची सत्तर वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यांना त्यांच्या वाढदिवसाबद्दल त्रिवेदी कुटुंबीय आणि आहुति परिवारातर्फे अंतःकरणापासून कोटी कोटी शुभेच्छा ! त्यांनी हाती घेतलेले सर्व संकल्प, प्रकल्प पूर्ण होवो या मनापासून सदिच्छा ! आमच्या शोभाताई म्हणजे कोकणातील फणसा सारख्या आहेत. अगदी बेधडक आणि फाडफाड बोलणाऱ्या असल्या तरी मनाने अतिशय प्रेमळ स्वभावाच्या, अडीअडचणीत मदतीला धावून जाणाऱ्या अशा आमच्या शोभाताईं आहेत. त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा !
१० मार्च १९५५ रोजी त्यांचा अंबरनाथ शहरात जन्म झाला. त्यांचे आजोबा भिकाजी गोविंद सरदार हे अंबरनाथ नगरपालिकेत पदाधिकारी होते. मदनसिंग मनविरसिंग यांच्या काळात ते सक्रीय राजकारणात होते. आशिया खंडातील सर्वात मोठी आणि सर्वात जुनी असलेल्या सूर्योदय सहकारी गृहनिर्माण संस्थेतही भि. गो. सरदार हे सरचिटणीस होते. शोभाताईचे वडील विष्णू भिकाजी सरदार हे याच सोसायटीचे अध्यक्ष होते. शोभाताईच्या मातोश्री शशिकला विष्णू सरदार या पालिकेच्या पहिल्या महिला उपनगराध्यक्ष होत्या. वडील विष्णू हे त्याकाळी प्रजासमाजवादी पक्षाचे सक्रीय नेते होते. अंबरनाथ नगर पालिकेचे डॉ. बी. जी. छाया रुग्णालय सुरु करण्यात भिकाजी सरदार यांचा मोलाचा वाट होता तर विष्णू हे त्याकाळी अंबरनाथ शहरातील प्रतिथयश डॉक्टर होते. भि. गो. आणि वि. भि. याच नावाने ते दोघेही प्रसिद्ध होते.
नंदुरबारच्या १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात बालंबाल बचावलेले वसंतराव आणि मनोरमा त्रिवेदी अर्थात माझे सासू सासरे हे १९५६ साली अंबरनाथ शहरात महाराष्ट्र हरिजन सेवक संघाचे प्रचारक म्हणून आले. त्यावेळ पासून सरदार आणि त्रिवेदी या कुटुंबियांचा घरोबा झाला तो घरोबा आजतागायत कायम आहे. अंबरनाथ शहरातील प्रत्येक उपक्रमात आणि आंदोलनात सरदार आणि त्रिवेदी बरोबरच असत. अगदी राजकारणात सुद्धा ते दोघेही बरोबरच असत. महाराष्ट्र हरिजन सेवक संघाची शाळा वाढवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
शोभाताई या येथील केंद्रीय विद्यालयात शिकल्या आणि मुंबईच्या एस. एन. डी. टी. महाविद्यालयातून पदवीधर झाल्या. अंबरनाथ मध्येच त्यांचा जन्म झाला आणि प्रभाकर शेट्टी यांचेशी त्यांचा प्रेम विवाह झाल्याने संसारही अंबरनाथ मध्येच. त्यामुळे या शहराबद्दल त्यांना प्रचंड आस्था आहे. अत्यंत स्पष्टवक्त्या स्वभावाच्या म्हणून प्रसिद्ध असल्या तरी त्या कपटी, खुनशी अजिबात नाहीत तर त्यांचा स्वभाव तितकाच प्रेमळ आहे. कोणाचे नुकसान होणार नाही, कोणावर अन्याय होवू नये याकडे त्यांचा कल अधिक असतो. कोकणातील फणसासारख्या आमच्या शोभाताई आहेत. समाजकारणाचा आणि राजकारणाचा वारसा हा त्यांना घरातूनच मिळाला असल्याने शहरातील अनेक संस्थांशी त्यांचा चांगला संबंध आहे. सूर्योदय सोसायटीच्या पहिल्या महिला चेअरमन होण्याचा बहुमान त्यांनाच मिळाला आहे. गेली वीस वर्षे त्या या सोसायटीत कार्यकारिणी मध्ये आहेत. सोसायटीचा शर्थ भंग प्रश्न सुटावा या साठी त्या सर्वांसह सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. सतत तीन वेळा त्या सोसायटीच्या चेअरमन म्हणून निवडून आल्या आहेत.
शोभाताई या काँग्रेस पक्षात सक्रीय आहेत. काँग्रेसच्या विचारांचा त्यांच्यावर पगडा आहे. पक्षाच्या तत्वांशी त्या एकनिष्ठ आहेत. तत्वाशी कधीही तडजोड करणे त्यांच्या स्वभावात नाही. आजही त्यांना अन्य पक्षातून विचारणा होत असताना त्याना विनम्र पणे त्यांनी नकार दिला आहे. पक्ष संकटात असताना तो सोडून जाणे त्यांना पटत नाही. पक्षाच्या प्रत्येक आंदोलनात आणि कार्यक्रमात त्या सहभागी होत असतात. त्यांचा जनसंपर्क प्रचंड असल्याने त्यांना काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनी महिला प्रदेश कार्यकारिणीवर सरचिटणीस म्हणून निवड केली. काही वर्षापूर्वी त्यांनी पालिकेची निवडणूक पक्षाच्या तिकिटावर लढवली होती. त्यावेळी अवघ्या सहा मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला होता. निवडून आल्यावर रस्ते, पाणी, स्वच्छता आदि कामांबरोबरच स्टेशन जवळ नियोजन पूर्वक भव्य असे वाहनतळ उभारण्याचा त्यांचा मानस होता. अजूनही आहे. जेणे करून स्टेशन जवळील सर्व लहान मोठ्या रस्त्यांवर वाहने उभी राहून वाहतूक खोळंबा होणार नाही हा त्यामागे उद्देश होता. हा उद्देश किती सार्थ होता ते आज त्या विभागातून फिरताना लक्षात येईल. प्रत्येक रस्त्यांवर गल्ली बोळात जिकडे पाहाल तिकडे कशीही वाहने उभी राहत आहेत. त्याचा त्रास तेथे राहणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. विशेष करून या परिसरात असलेल्या रुग्णालयात व अन्य कार्यालयात येणाऱ्या जाणार्यांना त्रास सहन करावा लागत आहे. रुग्ण वाहिनीही सहज पणे या मार्गावरून जावू शकत नाही याबद्दल त्यांना खंत वाटते.
सध्या त्या सूर्योदय सोसायटीच्या चेअरमन आहेत. श्री गजानन महाराज सेवा मंडळाच्या कार्यकारिणीत अनेक वर्षांपासून सक्रीय कार्यरत आहेत. रेल्वे स्टेशन जवळील श्री साई सेवा संस्था या संस्थेच्या त्या उपाध्यक्षा आहेत. समाजकारण आणि राजकारण करतानाच त्या स्वतः अत्यंत स्वावलंबी आहेत. त्यांचे स्वतःचे स्टेशन परिसरात शोभा ब्युटीक नावाचे दुकान होते. तेथे त्या स्वतः साडीला फॉल, बिडिंग सारखी कामे करीत असत. अंबरनाथच्या राजकारण आणि सूर्योदय सोसायटीच्या कामात शोभाताईच्या रूपाने सरदार घराण्याची तिसरी पिढी कार्यरत आहे हे विशेष आहे.
शासनाचे व्यसन मुक्ती आणि महिला सक्षमीकरणाचे प्रकल्प त्या प्रत्यक्ष समाज प्रबोधनाने करीत असतात. संकटकाळी मदतीला धावून जाण्याचा आणि मदत करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. मदत करताना गरीब, श्रीमंत, उच्च, नीच, जात, पंथ, धर्म, पक्ष असा कोणताही भेदभाव त्या करीत नाहीत. समाजात काम करताना त्या प्रसिद्धी पासून कोसो दूर अस्रतात. कोणताही सत्कार वा पुरस्कार त्या स्वीकारत नाहीत अथवा पुढेही येत नाहीत त्यांचे असे फोटो पाहायला दुर्मिळ. सार्वजनिक कार्यक्रमात अथवा उत्सव सोहळा असताना त्यात काम करताना त्या आपले पद न पाहता पडेल ते काम त्या करीत असतात. हाती घेतलेले काम चांगल्या पद्धतीने कसे पार पडेल यासाठीच त्यांचा कटाक्ष असतो. त्यांचे पती प्रभाकर शेट्टी यांचे अकाली निधन झाले. त्यावेळीही त्या न डगमगता आपले दु:ख्ख गिळून खंबीरपणे उभ्या राहिल्या. अत्यंत मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावाच्या आमच्या या ताईला दीर्घ आयुरारोग्य लाभो आणि त्यांनी हाती घेतलेले सर्व प्रकल्प आणि केलेले सर्व संकल् सिद्धीस जावो हीच शिवचरणी मनापासून प्रार्थना !
– सौ. मनिषा गिरीश त्रिवेदी, अंबरनाथ.
————————————————