मुंबई : भारतीय रेल्वेमध्ये मार्च २०२० पर्यंत ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटात सवलत मिळत होती मात्र ही सवलत कोरोना काळात बंद करण्यात आली. आता कोरोनाचे संकट संपून तीन वर्षे झाली तरी अद्याप ही सवलत सुरु केलेली नाही. ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटात दिलेली सवलत पुन्हा सुरू करावी, अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
लोकसभेत बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मेल, एक्सप्रेस, राजधानी, शताब्दी, दुरांतो या रेल्वे गाड्यांमध्ये ६० वर्षे वयोगटातील पुरुषांना ४०% आणि ५८ वर्षे वयाच्या महिलांना ५०% सवलत मिळत होती. या तरतुदीचा फायदा लाखो ज्येष्ठ नागरिकांना होत होता पण कोरोनाच्या काळात तो बंद झाला आता परिस्थिती सामान्य झाली असल्याने सरकारने ज्येष्ठ नागरिकांचा विचार करून ही सवलत पूर्वीप्रमाणे सुरु करावी. उपचारांसाठी किंवा धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी प्रवास करणाऱ्या वरिष्ठ नागरिकांसाठी ही सवलत अत्यंत उपयुक्त ठरते, असे खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
मुंबई ते छपरा ‘देशरत्न एक्स्प्रेस’ सुरू करा
देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मुंबई ते छपरा दरम्यान देशरत्न एक्स्प्रेस नावाने विशेष रेल्वे सुरू करावी अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्लीत भेट घेऊन वर्षा गायकवाड यांनी या मागणीचे पत्र रेल्वे मंत्र्यांना दिले. ही रेल्वे सुरू केल्याने बिहारमधून मुंबईत कामानिमित्त आणि कौटुंबिक कार्यक्रमांसाठी येणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठी मदत होईल. ही रल्वे त्वरित सुरू करावी अशी विनंती खासदार वर्षा गायकवाड यांनी रेल्वे मंत्र्यांना केली आहे.