ताज्या बातम्या

अभिजात मराठी…अभिमान मराठी…

मराठी भाषा दिनानिमित्त विशेष लेख….

हे विश्वची माझे घर l ऐसी मती जयाची स्थिर l किंबहुना चराचर l आपण जाहला ll
अशा ज्ञानेश्वरांच्या ओवींची ती मराठी,
सत्य असत्याशी मन केले ग्वाही l मानियेले नाही l बहुमता ll
अशा तुकोबांच्या अभंगांची ती मराठी,
‘स्वाभिमान’ आणि ‘स्वराज्य’ बहाल करणार्या छत्रपती शिवरायांची ती मराठी ,
तुकड्या तुकड्यात विभागलेल्या देशाला एकत्र बांधण्यासाठी संविधान देणार्या बाबासाहेबांच्या विद्वत्तेची ती मराठी,
माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होतिया काहिली अशी छक्कड आणि क्रांतीचे गीत गाणार्या अण्णा भाऊंच्या लेखणीची ती मराठी,
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी आपल्या छातीवर गोळ्या झेलणार्या 106 हुतात्म्यांची ती मराठी ..

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी..या काव्यपंक्तीनुसार आपल्याला अभिजात मराठीचा अभिमान असलाच पाहिजे.
कारण १२०० पेक्षा जास्त शब्दकोश मराठी भाषेत आहेत . जे इंग्रजी वगळता इतर कुठल्याही भाषेत नाहीत. १४ कोटी लोक मराठी भाषा बोलतात. ११३ देशांमध्ये मराठी भाषीक लोक वास्तव करतात. सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेतील मराठी ही देशातील तिसरी आणि जगातील १० व्या क्रमांकाची भाषा आहे.

आणि अशा संपन्न भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून मा. पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्रात मुख्यमंत्री असताना १० जानेवारी २०१२ रोजी एक तज्ञ समिती गठित करण्यात आली. अध्यक्षस्थानी रंगनाथ पठारे यांना अध्यक्ष नियुक्त करत त्या समितीत प्रा. हरी नरके, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, सतीश काळसेकर, डॉ. कल्याण काळे, प्रा. आनंद उबाळे यांची सदस्य म्हणून नेमणूक केली.
आणि यांच्या अथक परिश्रम आणि संशोधन अहवालाअंती ३ ऑक्टोबर २०२४ रोजी केंद्र सरकारने मराठीच्या अभिजातपणावर शिक्कामोर्तब केले. आणि आम्हा सर्वांची छाती अभिमानाने फुगली.

खरं तर अभिजात भाषेसाठी काही निकष आहेत. ती म्हणजे ती भाषेची प्राचिनता..भाषेचे वय हे दीड ते दोन हजार वर्षे असावे. मराठी बद्दल बोलायचे झाल्यास
मराठी भाषेमध्ये सातवाहन राजा हाल याने गाथासप्तशती हा ग्रंथ सातव्या शतकात लिहला होता. विवेक सिंधु, लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी हे ग्रंथ तर प्राचीन आहेतच. शिवाय कर्नाटक मधील श्रवणबेळगोल येथे बाहुबलीच्या पुतळ्याखाली कोरलेले श्री चामुण्डेराजे करवियले..हे वाक्य मराठीच्या प्राचिनतेची साक्ष देण्यासाठी उपयोगी ठरले.
दुसरा निकष म्हणजे श्रेष्ठ दर्जाचे साहित्य..
अगदी संत ज्ञानेश्वर- नामदेव, कुसुमाग्रज, बालकवी, शांता शेळके, गडकरी, अण्णाभाऊ साठे , ते नामदेव ढसाळ, नेमाडे, अशोक बागवे, प्रविण दवणे, महेंद्र कोंडे या पर्यंत या साहित्यीकांनी मराठी समृद्ध केली. असे अतिशय विशाल साहित्य संपदा मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहे.
तिसरा निकष म्हणजे भाषा स्वयंभु असावी ती इतर भाषेची नक्कल नसावी..हा निकषही मराठीने पुर्ण केला‌ .कारण संत एकनाथांनीच ठणकावून सांगितले होते की संस्कृत वाणे देवे केली मग मराठी काय चोरांपासूनी आली. म्हणजेच माझी मराठी स्वयंपूर्ण आहे.. आहे.
अशाप्रकारे सर्व निकष पूर्ण करत माझ्या माय मराठीने अभिजातपणाचा झेंडा फडकाविला.

हा झाली नाण्याची एक बाजू पण दुसरी बाजु सुद्धा उलगडून दाखवावीशी वाटते. कारण आजच्या मुलांना शेक्सपिअरच्या नाटकांचे व
नाव विचारले तर गर्वाने सांगतील. हिंदी चित्रपटाचे नाव विचारले तर दोन जागेवर वाकडं होत झुकेगा नहीं साला म्हणत पुष्पा सह अनेक नाव सांगतील. पण नुकतच वाचलेलं मराठी पुस्तकाचे नाव सांगा ..असं विचारलं तर निशब्द होतील. तेव्हा अभिजात मराठीची पुढील वाटचाल करताना ही बाब लक्षात घ्यावी लागेल.आपल्याला वाचनसंस्कृती वाढवावी लागेल.

घराबाहेर पडले की बोलताना तेरेको, मेरेको, ए भैय्या कितने को दिया..यु नो, सो, ब्ला ब्ला ब्ला..अशी फँशन म्हणून भाषा बोलत..भाषेची तोडफोड करून भाषिक अत्याचार करतील. तेव्हा अभिजात मराठीची पुढील वाटचाल लक्षात घेताना बोलतो मराठी..ही बाब बिंबवावी लागेल. मराठीतच बोलावं लागेल.याचा अर्थ असा नाही की इतर भाषेचा तिरस्कार करायचा. इतर भाषा जरूर शिका. अहो इतर भाषा अंगणात खेळु द्या. पण मराठी देवघरात असु द्या. मनात असु द्या. ओठात असु द्या.

English is the Window of knowledge. इंग्रजी ही ज्ञानाची खिडकी असेल ..असु द्या. पण मराठीला ज्ञानाचा दरवाजा करायला काय हरकत आहे….! कारण खिडकीतून चोर येतात. आणि दरवाज्यातून सज्जन.
अभिजात मराठीची पुढील वाटचाल करताना मराठी शाळा टिकल्या पाहिजेत. मुले मराठीत शिकली पाहिजेत. कारण फुललारं फुल कुठंही फुलतं.. चिखलात देखील कमळ उगवतं.. इंग्रजी भाषेचं अतिमहत्व आपल्या मेंदूवर बिंबवल गेलं आहे. त्यामुळे आपण सोनं हरवून बसलो आहोंत. एक कवी फार सुंदर म्हणतो की,
चिंध्या घालून सोने विकायला गेलो कुणी पुसता पुसेना,
सोने घालून चिंध्या विकायला गेलो गर्दी हटता हटेना. आपण सत्व ओळखलं पाहिजे. जे आपल्यासाठी जिवनसत्व असेल.

अभिजात मराठीची पुढील वाटचाल करताना मला वाटतं मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे. मराठी संगणकाची भाषा झाली पाहिजे.
अभिजात मराठीची पुढील वाटचाल करताना मराठी संशोधनाची , रोजगाराची, पोटापाण्याची , व्यवहाराची भाषा झाली पाहिजे.

खरं तर मराठी भाषा ही संपन्न आहे, सधन आहे. अहो साप दिसल्यावर अरे बापरे… आणि काटा टोचल्यावर आई गं..असं जोपर्यंत आपल्या तोंडातून अपसुकपणे निघेल ना… तोपर्यंत अभिजात मराठी जिवंत राहील. यात तिळमात्र शंका नाही. त्यामुळे अभिमानाने अभिजात मराठी वाचुयात , अभिजात मराठीत लिहुयात.. अभिजात मराठीत ऐकुयात.. आणि अभिजात मराठीत बोलुयात..
जातांना कवितेच्या काही ओळी ठेवतो आणि रजा घेतो.
मराठी बोल परखड आणि स्पष्ट
मराठीत बोलुया जय महाराष्ट्र …
जय महाराष्ट्र..

नारायण वसंतराव लांडगे पाटील
शिक्षक, नवी मुंबई महानगरपालिका
मो. 8208073362
इमेल आयडी – landagenarayan@gmail.com

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top