कराड(प्रताप भणगे) : दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचे संरक्षण करण्यासाठी पाचुपतेवाडी ग्रामपंचायतीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. साठवण तलावातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार असून, तलावात कपडे धुणे आणि भांडी घासण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबत ग्रामपंचायतीने दक्षता सूचनाफलक लावून नागरिकांना स्पष्ट इशारा दिला आहे.
पाचुपतेवाडी, ता. कराड येथील साठवण तलावातील पाणीसाठा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा आहे. पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचा वापर जपून व्हावा आणि पाणीसाठा दूषित होऊ नये, यासाठी ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतल्याचे सूचनाफलकावर नमूद करण्यात आले आहे.
८ ऑक्टोबर रोजी ठराव; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
ग्रामपंचायतीच्या सूचनाफलकानुसार, दिनांक ८ ऑक्टोबर २०२६ रोजी ठराव क्रमांक ६(१) अन्वये तलावात कपडे धुणे व भांडी घासण्यास मनाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
दुष्काळात पाण्याचे महत्त्व ओळखण्याची गरज
पाणीटंचाईच्या काळात पिण्याच्या पाण्याचे जतन करणे ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. तलावातील पाण्याचा गैरवापर टाळणे, पाणीसाठा स्वच्छ ठेवणे आणि ग्रामपंचायतीच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
पाचुपतेवाडी ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे पिण्याच्या पाण्याचे संरक्षण करण्याचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचत आहे. दुष्काळाच्या संकटात पाण्याचा प्रत्येक थेंब जपणे हीच काळाची गरज आहे.
पाणी वाचवा, पाणी जपून वापरा; आजची बचत उद्याच्या पाण्याची हमी!




