ताज्या बातम्या
नवी मुंबईकरांना सुरळीत पाणीपुरवठा करा; जुन्या विहिरी पुनर्जीवित करण्याची गरज! वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनहिताच्या भूमिकेचे कौतुक; नागरिकांनाही पाणी जपून वापरण्याचे आवाहनदुष्काळग्रस्तांना ५ हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टाच; कराडचा दुष्काळ यादीत समावेश काँग्रेसच्या आंदोलनाच्या रेट्यामुळेच – बाबुराव पवारमहापौर श्रीम. सुजाता पाटील यांनी केली नवी मुंबई महानगरपालिका शाळांची प्रत्यक्ष पाहणीभिवंडीत एसआयआर प्रक्रियेत ४९ टक्के मतदारांची नावे वगळली! आमदार रईस शेख यांचा गंभीर आरोप; केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रारपाचुपतेवाडीत साठवण तलावाच्या पाण्यासाठी ग्रामपंचायत आक्रमक; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा!

पुस्तक हातात घेऊन वाचनात जी मजा आहे ती ऑनलाईन वाचनात नाही – डॉ.संदीप डाकवे

तळमावले : र्श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचालित काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले येथील ग्रंथालय विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, आणि सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्ताने समारंभाचे प्रमुख पाहुणे डॉ. संदीप डाकवे यांनी ‘डिजिटल वाचन आणि ई-बुक्स’ या विषयावर बोलताना ग्रंथ, पुस्तक हातात घेऊन वाचनात जी मजा आहे ती ऑनलाईन वाचनात निश्चितच नाही. असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमात डॉ.संदीप डाकवे यांनी स्वतःच्या ग्रंथ संग्रहातील जवळपास 15 मौलिक ग्रंथ महाविद्यालयाच्या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे मध्यवर्ती ग्रंथालयाला भेट दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य प्रो. (डॉ.) उषादेवी साळुंखे होत्या. वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून मराठी विभागाच्या वतीने ‘वाचनकट्टा ‘ या उपक्रमाचे उद्घाटन डॉ. संदीप डाकवे आणि प्रभारी प्राचार्य प्रो. (डॉ.) उषादेवी साळुंखे यांचे शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी व गुरूदेव कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे डॉ. संदीप डाकवे पुढे म्हणाले, साधी राहणी व उच्च विचारसरणी असणारे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे समग्र जीवन अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत विद्याग्रहण व ज्ञानदानाचे कार्य उत्स्फूर्तपणे केले. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम हे अत्यंत कुशाग्र बुध्दीमत्ता लाभलेले विद्याव्यासंगी, कष्टाळू , जिद्दी, महत्वाकांक्षी, राष्ट्रप्रेमी, मानवतावादी विचारांचे होते.
ते पुढे म्हणाले, वाचनामुळे माणसाची वैचारिक पातळी वाढली जाते. वाचन आपलं आयुष्य समृद्ध करते. सदृढ समाज निर्माण करण्यासाठी सतत वाचन, चिंतन, मनन, लेखन व संवाद आवश्यक आहे. चांगल्या साहित्याचे वाचन केल्याने संवेदनशीलता, मुल्ये आणि संस्कार जपले जातात. त्यामुळे तरुण पिढीला वाचनाची गरज आहे. अध्यक्षीय मनोगतात प्रभारी प्राचार्य प्रो. (डॉ.) उषादेवी साळुंखे भाषणात म्हणाल्या, डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. एक उत्कृष्ट विद्यार्थी, आदर्श शिक्षक, मार्गदर्शक, प्रतिभावान साहित्यिक व उच्च कोटीचे शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी अतिशय प्रभावीपणे कार्य केले. ते सतत विद्यार्थ्यांशी संवाद करत असत. त्यांनी प्रेरणादायी असे जवळपास २५ ग्रंथ लिहिले आहेत. त्यांच्यामते देशाची युवा शक्ती हीच सर्वात मोठी उर्जा आहे. तरुणांनी त्यांच्या ‘ अग्नीपंख’ या आत्मचरित्राचे पारायण करणे आवश्यक आहे.
डॉ.संदीप डाकवे यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व जडणघडणीत त्यांनी जपलेला वाचन संस्कार महत्त्वाचा ठरलेला आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा व आवड निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. तरुणांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी ऑनलाईन पद्धतीने आपल्या ग्रंथालयामध्ये सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.
याप्रसंगी प्रा.सौ.ज्योती उर्फ मनिषा पाटील यांनी स्वरचित “पाऊस” या ललित लेखाचे ओघवत्या शैलीत वाचन केले. यावेळी उपस्थितांनी बंकिमचंद्र चटर्जी आणि त्यांनी लिहिलेल्या वंदे मातरम या गीताविषयीची माहिती वाचन केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल श्री.योगेश शिंदे, श्री.अनिल जाधव, गुरुदेव कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत ग्रंथपाल श्री.योगेश शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.सौ.दीपाली पाटील यांनी केले.
आभार डॉ.महेश चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाची छायाचित्रे प्रा.धीवार सर यांनी काढली. फलक लेखन प्रा.डॉ.राजेंद्र लादे यांनी केले.

Scroll to Top