कराड : जागतिक तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धन, अध्यात्म आणि सामाजिक जनजागृतीचा संदेश जनमानसात रुजविण्यासाठी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त उपपीठ श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर आणि नाशिक येथून श्रींच्या पादुका घेऊन निघणाऱ्या या दिंड्या १४ ते १७ ऑक्टोबरदरम्यान कराड तालुक्यातून मार्गक्रमण करणार आहेत.
या दिंडीच्या मार्गावरील प्रत्येक विसाव्याच्या ठिकाणी सात वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, केवळ वृक्षारोपण करून न थांबता लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारीही निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षणाचा संदेश कृतीतून देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे.
दिंडीत वारकरी, भाविक आणि स्वयंसेवक सहभागी होणार असून, श्रींच्या पादुकांसह गावोगावी पोहोचणाऱ्या या दिंडीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, सामाजिक बांधिलकी आणि अध्यात्म यांचा संगम साधला जाणार आहे.
नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या माध्यमातून वेदपाठशाळा, मोफत रुग्णवाहिका सेवा, अवयवदान, नेत्रदान, रक्तदान, त्वचादान, मरणोत्तर देहदान, विनामूल्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल आणि मोफत शिक्षण असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. याच सेवाभावी कार्याचा विस्तार म्हणून ‘वसुंधरा पायी दिंडी’च्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती केली जाणार आहे.
या दिंडीचे कराड तालुक्यात ठिकठिकाणी स्वागत करून वृक्षारोपण आणि सामाजिक जनजागृतीच्या उपक्रमात नागरिक, भाविक व स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन कराड तालुका सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.




