मुंबई : क्राफ्ट पेपरच्या किमतींमध्ये अवघ्या तीन महिन्यांत २२ ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने कोरुगेटेड बॉक्स उत्पादन उद्योग आर्थिक संकटात सापडला आहे. वेस्टर्न इंडिया कोरुगेटेड बॉक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (WICMA) वतीने या दरवाढीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत असोसिएशनचे अध्यक्ष श्लोक केडिया यांनी उद्योगाच्या समस्यांकडे लक्ष वेधले.
क्राफ्ट पेपरच्या दरात ग्रेडनुसार प्रतिकिलो सात ते दहा रुपयांची वाढ झाली आहे. रद्दी कागद, पुनर्वापरित फायबर, ऊर्जा, इंधन, रसायने आणि वाहतूक खर्चातील वाढ, तसेच निर्यातीचा वाढता कल यामुळे पेपरच्या किमतींवर परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले. त्यातच आवश्यक दर्जाचा आणि पुरेशा प्रमाणातील पेपर वेळेवर मिळवणेही उत्पादकांसाठी कठीण बनले आहे.
या उद्योगातील बहुतांश सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग अत्यल्प नफ्यावर काम करतात. त्यामुळे उत्पादन खर्च आणि विक्रीदर यातील तफावत वाढत आहे. याचा परिणाम अन्नपदार्थ, औषधे, एफएमसीजी उत्पादने आणि ई-कॉमर्सच्या पुरवठा साखळीवर होण्याची शक्यता आहे.
ग्राहकांनी वाढलेल्या खर्चानुसार योग्य दरसुधारणा स्वीकारावी आणि पेपर मिल्सनी किमती स्थिर ठेवून पुरेसा पुरवठा सुनिश्चित करावा, असे आवाहन WICMA ने केले आहे.




