ताज्या बातम्या

अदानी इलेक्ट्रिसिटीविरोधात कामगारांचा एल्गार; ३ सप्टेंबरपासून बेमुदत संपाची हाक

मुंबई : अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई कंपनीतील कामगार व अधिकाऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून आता संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत. कर्मचारी कपात, सक्तीच्या बदल्या आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे कंपनीकडून होत असलेल्या कथित दुर्लक्षाच्या निषेधार्थ ‘अदानी इलेक्ट्रिसिटी समन्वय संघर्ष समिती’ने बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.
दादर (पूर्व) येथील राजे शिवाजी विद्यालय सभागृहात झालेल्या सभेत ३ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजल्यापासून बेमुदत संप सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे अदानी इलेक्ट्रिसिटीच्या कामकाजावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कंपनीने सुमारे ४५० अधिकाऱ्यांना सेवेतून मुक्त करण्यासाठी दिलेल्या नोटिसा तातडीने मागे घ्याव्यात, तसेच सक्तीच्या कराराच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांवर दबाव आणण्याची भूमिका थांबवावी, अशी मागणी समितीने केली आहे. याशिवाय एकतर्फी बडतर्फ करण्यात आलेल्या ४० अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्यावे, अशीही मागणी करण्यात आली.
कायमस्वरूपी स्वरूपाच्या कामांसाठी सुरू करण्यात आलेली कंत्राटी कामगार पद्धत रद्द करावी, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा आणि कर्मचाऱ्यांच्या सेवा-सुरक्षेची हमी द्यावी, अशी भूमिका संघर्ष समितीने घेतली आहे.
सभेत समन्वयक प्रदीप मयेकर, पवन गायकवाड, विठ्ठलराव गायकवाड, प्रदीप बोरकर, वामन कदम आणि हरी शास्त्री यांच्यासह कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. मागण्यांवर तोडगा न निघाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

Scroll to Top