ताज्या बातम्या

अनाथ बालकांसोबत लावणी कलावंत महासंघाचा भावपूर्ण रक्षा बंधन सोहळा

मानखुर्द : लावणी कलावंत महासंघाच्या वतीने आणि श्री श्री बालाजी फाउंडेशनच्या सहकार्याने मंगळवार, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी मानखुर्द येथील चेंबूर चिल्ड्रन होममधील अनाथ बालकांसोबत आगळ्यावेगळ्या पद्धतीने रक्षा बंधन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
बालरंगभूमीच्या अध्यक्षा निलमताई शिर्के-सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी महासंघाच्या हितचिंतक चारुशीलाताई गोलम, शिवाजी शिंदे, चिल्ड्रन होमचे अधिकारी, लावणी कलावंत महासंघाचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात मुलांच्या मनोरंजनासाठी जादूचे प्रयोग, कराओके ऑर्केस्ट्रा तसेच डी.जे. डान्सचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे चिल्ड्रन होममधील मुलांनी मनसोक्त आनंद लुटला.
यावेळी मुलांना शालेय साहित्य, जीवनावश्यक वस्तू, सुका खाऊ, बिस्कीट, ज्यूस, पादत्राणे तसेच विविध भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. रक्षा बंधनाचे औचित्य साधून महिला कलाकारांनी चिल्ड्रन होममधील मुलांना, तर मुलींनी पुरुष कलाकारांना राखी बांधून स्नेह आणि आपुलकीचा संदेश दिला.
या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत अनाथ बालकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य आणि आनंद पाहून उपस्थित कलाकार व मान्यवरही भावूक झाले. ‘सणाचा खरा आनंद तो इतरांसोबत वाटण्यात आहे’, हा संदेश या सामाजिक उपक्रमातून देण्यात आला.

Scroll to Top