ताज्या बातम्या

सेवानिवृत्तीच्या शेवटच्या रेल्वे प्रवासातही जपली सहप्रवाशांनी मैत्री…

टिटवाळा(अजित जगताप) : माणसाच्या जीवनातील अनेक प्रसंगांमध्ये सह प्रवासी भेटतात. चांगल्या- वाईट अनुभव देऊन ते निघून जातात. परंतु, मैत्री जपणाऱ्या सह प्रवाशांमुळे राष्ट्रीयकृत बँकेत दीर्घकाळ सेवा बजावल्यानंतर
सेवानिवृत्त झालेले रेल्वे प्रवासी सुकुमार माने (काका) यांचा त्यांच्या रेल्वे
सहप्रवाशांनी प्रेम आणि आपुलकीने आगळावेगळा सन्मान केला. जातीपातीच्या पलीकडे जाऊन मैत्रीचे ठिकाण गाठणाऱ्या या मित्रांनाही अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत
याबाबत माहिती अशी की, बँक ऑफ बडोदा या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये कार्यरत असणारे कर्मचारी श्री सुकुमार माने हे नेहमी दैनंदिन कामकाजा निमित्त आपल्या घरातून सकाळी टिटवाळा येथून नऊ वाजून ४० मिनिटांनी सुटणाऱ्या लोकल रेल्वेने प्रवास करत होते. सुरुवातीला एकमेकांचे चेहरे पाहत असताना संवाद साधण्यात आला. यातूनच मग मैत्रीची रेल्वे सुद्धा रुळावरून पुढील प्रवासासाठी गती घेऊ लागली. पंधरा-वीस मिनिटांच्या सहवासात माणुसकीचे नाते घट्ट झाले. एकमेकांचे सुखदुःख शेअर्स करत जीवनाची गाडी सुद्धा गती घेत होती.
या टिटवाळा ते छत्रपती शिवाजी टर्मिनल लोकल रेल्वेच्या प्रवासादरम्यान गणेश कोकतरे, अजय हरणे, तुषार झोपले,
अनिकेत कौशल, अश्विन जोशी, अशोक नेमांने यांच्यासह अनेक सहप्रवाशांशी श्री माने यांचे व्यक्तिगत जीवनातीलही जिव्हाळ्यांचे मैत्रीचे नाते विणले गेले. त्यातून सुंदर अशी कलाकृती निर्माण झाली. एकमेकांची आपुलकीने काळजी घेणारे मित्रपरिवार या छोट्याशा रेल्वेच्या डब्यामध्ये एक वेगळा विश्व म्हणून एकमेकांना साथ देत होते. ही साथ कायम राहावी अशी अनेकांनी भगवंता चरणी प्रार्थना केली आहे. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. हीच शिकवण देण्यात आली आहे.
आयुष्यातील महत्त्वाच्या प्रवासामध्ये राष्ट्रीयकृत बँकेतील वयोमानानुसार सेवा संपण्याचा दिवस उजाडला होता. श्री सुकुमार माने आता पुन्हा नक्कीच भेटतील. पण नऊ वाजून ४० मिनिटांनी सुटणाऱ्या टिटवाळा लोकल मधील त्यांंचे आगमन आता नियमित घडणार नाही. याची आठवण ठेवून सहप्रवाशांनीह रेल्वेच्या डब्यातच त्यांच्या सेवानिवृत्तीच्या सोहळा साजरा केला. या भाऊजी व तितक्यात महत्त्वाच्या कार्यक्रमाला इतर सह प्रवाशांनी ही साथ दिली.

श्री .सुकुमार माने यांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन स्नेहपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी रेल्वे प्रवासातील जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये निस्वार्थी भावनांचा ओलावा होता. आईची ऊब होती. त्यावेळी रेल्वेचा डबा सुद्धा निश्चितच गहिवरला असेल. असाच हा प्रसंग अनेकांच्या जीवनात यावा अशी सदिच्छा देण्यात आली.
मुंबई ठाणे नवी मुंबईच्या धावत्या जीवनात दररोजच्या लोकल रेल्वेच्या प्रवासाने अनेकांच्या लग्नगाठीसुद्धा जुळून आलेले आहेत. तसेच काहींची मैत्री सुद्धा टिकून राहिलेली आहे. परंतु, नऊ चाळीसच्या टिटवाळा लोकल रेल्वेच्या डब्यात सेवानिवृत्ती निमित्त झालेला हा पहिला सत्कार असावा. आता श्री सुकुमार माने यांनी आपल्या वरळी बी.डी.डी. चाळीतील बालपणाच्या मित्रांसमवेत सेवानिवृत्तीचा कार्यक्रम साजरा करावा अशी अपेक्षा डॉ. अरुण माने, फलटणचे राजेंद्र रणदिवे, श्याम रोकडे, प्रवीण कदम, सुधाकर वाढते, प्रवीण गायकवाड, युवराज घाडगे, देविदास मोतलिंग, राजेश कांबळे यांच्यासह इतर मित्रांनी केली आहे.

———————–फोटो ९.४० च्या लोकल रेल्वेमध्ये जेव्हा दुरुस्तीनिमित्त श्री. माने यांचा सत्कार करताना मान्यवर (छाया– निनाद जगताप टिटवाळा)

Scroll to Top