मुंबई(भीमराव धुळप) : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पातील दरड कोसळण्याच्या घटनेवरून विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना ठाम शब्दांत उत्तर दिले.
प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करा, शिव्या द्या; पण महाराष्ट्राची बदनामी मी कदापि सहन करणार नाही. महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांना हा देवेंद्र फडणवीस सोडणार नाही.”
राज्यात अभूतपूर्व पाऊस झाल्यामुळे मिसिंग लिंक प्रकल्पाच्या एका भागात दरड कोसळली असून, त्याव्यतिरिक्त मोठे नुकसान झालेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. हा प्रकल्प जगातील सर्वांत उंच केबल-स्टे (व्हायाडक्ट) पूल आणि सर्वांत मोठ्या बोगद्यांपैकी एक असल्याचे सांगत, भविष्यात हा प्रकल्प महाराष्ट्राच्या विकासाचे प्रतीक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोकण रेल्वे प्रकल्पाचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, सुरुवातीला त्या प्रकल्पालाही अनेक अडचणी आल्या होत्या. मात्र त्या दूर करून तो यशस्वी झाला आणि आज मधू दंडवते यांचे नाव त्या प्रकल्पाशी कायम जोडले गेले आहे. मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण करणाऱ्या अभियंते, तंत्रज्ञ आणि ठेकेदारांचे त्यांनी अभिनंदन करत, “विरोधकांनी टीका करावी, आम्ही मात्र पारदर्शकपणे विकासाची कामे सुरू ठेवू,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.




