ताज्या बातम्या

देगाव फाट्यावर हायवेलगत कचऱ्याचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ, प्रशासनाचे दुर्लक्ष

सातारा : सातारा शहरालगतच्या देगाव फाटा परिसरात राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाळ्यात या कचऱ्यातून दुर्गंधी पसरत असून माशा, डास आणि भटक्या जनावरांचा वावर वाढल्याने संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
महामार्गालगत पडलेला कचरा परिसराच्या सौंदर्यावरही परिणाम करत असून दररोज हजारो वाहनचालकांच्या नजरेस ही अस्वच्छता पडत आहे. पावसाचे पाणी कचऱ्यासह नाल्यांमध्ये वाहून गेल्यास तुंबण्याचा धोका असून पर्यावरणालाही मोठा फटका बसत आहे.
स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याची नाराजी व्यक्त केली आहे. हायवेलगत कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, नियमित स्वच्छता मोहीम राबवावी आणि या ठिकाणी कायमस्वरूपी देखरेख ठेवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
‘स्वच्छ भारत’ अभियानाची घोषणा एका बाजूला आणि महामार्गालगत वाढणारे कचऱ्याचे ढीग दुसऱ्या बाजूला, अशी विरोधाभासी परिस्थिती देगाव फाटा परिसरात पाहायला मिळत आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

Scroll to Top