ताज्या बातम्या

कराड–पाचवड फाटा राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक धोक्यात; संबंधित विभागाचे दुर्लक्ष

कराड–पाचवड फाटा येथील राष्ट्रीय महामार्गावर (NHAI) पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका वाढला असून दुचाकीस्वारांना विशेषतः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
स्थानिक नागरिक व वाहनधारकांच्या म्हणण्यानुसार, पावसाळा सुरू झाल्यानंतर ही समस्या वारंवार निर्माण होत आहे. पाणी निचऱ्याची व्यवस्था अपुरी असल्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावतो आणि वाहनांच्या रांगा लागतात.
वाहनधारकांनी अनेक वेळा संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप केला जात आहे. राष्ट्रीय महामार्गासारख्या महत्त्वाच्या मार्गावर अशी परिस्थिती निर्माण होणे ही गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे मत आहे.
स्थानिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि संबंधित विभागाने तातडीने पाणी निचऱ्याची व्यवस्था सुधारून साचलेले पाणी हटवावे तसेच भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

Scroll to Top