ताज्या बातम्या

नवी मुंबईत समान पाणीवाटपासाठी निवेदन; महापौर सुजाता पाटील यांचे सकारात्मक आश्वासन

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा व्यवस्थापन अधिक प्रभावी, पारदर्शक आणि सर्व नागरिकांना समान लाभ देणारे व्हावे, या मागणीसाठी ज्येष्ठ पत्रकार रमेश औताडे आणि महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त पत्रकार तथा संपादक भीमराव धुळप यांनी आज महापौर सौ. सुजाता पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले.
निवेदनामध्ये शहरातील वाढती लोकसंख्या, पाण्याची वाढती मागणी आणि भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन काही महत्त्वपूर्ण उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सर्व भागांना समान निकषांवर सकाळी दोन तास व संध्याकाळी दोन तास पाणीपुरवठा करणे, काही भागांतील चोवीस तासांचा पाणीपुरवठा नियंत्रित करून समान पाणीवाटप करणे, सर्व निवासी व व्यावसायिक इमारतींमध्ये पाणी मीटर बसविणे, पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी जनजागृती आणि दंडात्मक कारवाई करणे तसेच रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि पुनर्वापर प्रकल्पांना प्रोत्साहन देणे या मागण्यांचा समावेश आहे.
महापौर सौ. सुजाता पाटील यांनी निवेदनाची दखल घेत संबंधित सूचनांचा सकारात्मक विचार करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत आश्वासन दिले. शहरातील उपलब्ध जलस्रोतांचा कार्यक्षम वापर आणि भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याने प्रभावी नियोजन करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Scroll to Top