मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात मोठ्या संख्येने जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील प्रलंबित कामांचा आढावा घेण्यापेक्षा कामांना प्रत्यक्ष वेग देण्यात येत आहे. महामार्गावरील कोलाड, संगमेश्वर, निवळी आणि लांजा येथील उड्डाणपुलांची कामे ३१ ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामांची सद्यस्थिती जाणून घेतली.
मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या निर्देशानुसार गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कामांमध्ये कोणताही विलंब होऊ नये, अशा स्पष्ट सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच आढावा घेत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष कामाला वेग देण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.
*नागोठणे उड्डाणपुलाच्या कामाला तांत्रिक अहवालानंतर वेग*
मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणे येथील रखडलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी आयआयटीची तांत्रिक मदत घेण्यात येत आहे. आयआयटीचा तांत्रिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे. तोपर्यंत पुलाच्या खालील दोन्ही बाजूंच्या महामार्गाची दुरुस्ती करण्याचे आदेशही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले आहेत.
*माणगाव बायपासवरील साईड लेन २० ऑगस्टपासून सुरू*
माणगाव बायपासवरील एकेरी वाहतूक सुरू करण्यासाठी आवश्यक कामे वेगाने पूर्ण करण्यात येत आहेत. सुमारे ७.५ किलोमीटरचा मार्ग ५.५ किलोमीटरपर्यंत एकेरी वाहतुकीसाठी सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यानंतरच्या टप्प्यात २० ऑगस्टपासून रेल्वे पुलावरील गर्डर टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित दोन किलोमीटर मार्गही एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. त्यामुळे माणगाव बायपासवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.
*चिपळूण उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात*
चिपळूण येथील सर्वात मोठ्या उड्डाणपुलाचे कामही वेगाने पूर्ण केले जात आहे. उड्डाणपुलावरील गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, प्रांत कार्यालयाजवळील भरावाचे कामही वेगाने सुरू आहे. पावसाने उसंत दिल्यास गणेशोत्सवापूर्वी हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.
गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, ठाणे, पुणे तसेच राज्याच्या इतर भागांतून कोकणात जाणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि कोंडीमुक्त व्हावा, यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील कामांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून निश्चित मुदतीत प्रकल्प पूर्ण करावेत, असे निर्देश मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिले.




