पनवेल(अमोल पाटील):- नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी पनवेल तालुक्यातील पी.एम. श्री. रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वहाळ येथे आयोजित करण्यात आलेला शाळा प्रवेशोत्सव २०२६ कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री मा श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक व डिजिटल शिक्षणाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शाळेतील ‘आयडियल सेंटर’ (इंटरॅक्टिव्ह डिजिटल, एक्सपेरिमेंटल, ॲडमिनिस्ट्रेशन अँड लर्निंग सेंटर) चे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक अभ्यासक्रम डिजिटल माध्यमातून उपलब्ध होणार असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण अधिक प्रभावी व दर्जेदार होणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरांप्रमाणेच आधुनिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरू करण्यात आलेल्या मूल्यशिक्षण उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, सामाजिक जाणीव, हक्क व कर्तव्यांची समज, स्वच्छतेची सवय तसेच पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणासोबतच जबाबदार आणि आदर्श नागरिक घडविण्याचा हा प्रयत्न राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोलाचा ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
खाजगी शाळांऐवजी जिल्हा परिषद शाळांकडे वाढत असलेला विद्यार्थ्यांचा कल हा शिक्षण क्षेत्रासाठी सकारात्मक बदल असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देताना त्यांनी दर्जेदार शिक्षण, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून सक्षम पिढी घडविण्याचा राज्य शासनाचा निर्धार पुन्हा अधोरेखित केला.
या कार्यक्रमाला माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, आमदार विक्रांत पाटील, आमदार महेश बालदी, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जिल्हाधिकारी किशन जावळे, विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




