सातारा(अजित जगताप) : काँग्रेस विचारधारा मानणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांची पूर्वी लोकल बोर्ड मेंबर अशी ओळख होती. आज ही ओळख पुसली असून भाजप विचारसरणीच्या सातारा जिल्हा परिषदेची स्थायी समिती सभा जिल्हा परिषद परिसरातील जुन्या लोकल बोर्ड इमारतीतील झाली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेमध्ये सर्वांनी सहभाग नोंदवला मात्र, विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने धोरणात्मक निर्णय घेणे टाळले.
समिती सभेच्या प्रारंभी सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्यासह विविध विषय समित्यांचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी अधिकाऱ्यांचे राजेशाही थाटात आगमन झाले.
आगामी श्री विठ्ठल रखुमाई पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात येणाऱ्या पालखी मार्गावरील सुविधा, नियोजन आणि प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांबाबत सादरीकरण केले. आषाढी वारीसाठी सातारा जिल्ह्याला २० कोटी ८२ लाख रुपयांचा भरीव निधी उपलब्ध झाला आहे. या निधीचा उपयोग सच्चा वारकऱ्यांना किती प्रमाणात मिळेल? हे गुलदस्त्यात आहे. याव्यतिरिक्त ठेकेदारातून होणाऱ्या कामकाजाबाबत फारशी चर्चा झाली नसल्याचे समजते.
सातारा जिल्ह्यात अनेक जलनायक प्रसिद्धी मिळवून जातात तरीही आजही दुष्काळी भागांतील टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. चार दिवसानंतर सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शाळा प्रवेश दि: १५ जूनपासून सुरू होत आहे. आता अनेक प्राथमिक शाळेमधील पटसंख्या घसरणीला लागलेली आहे. धावडशी सारख्या जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी आणण्यासाठी प्राथमिक शिक्षकांनाच एस.टी.ने प्रवास करावा लागत आहे. आजूबाजूच्या गावातील विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत घेऊन जाण्यासाठी व परत घरी आणण्यासाठी सध्या प्राथमिक शिक्षकांना वेळ द्यावा लागत आहे. याबाबत आता जिल्हा परिषदेने कौतुक सोहळा घेतले गरजेच्या आहे. अशी अपेक्षा पालकांची आहे.
पूर्वी नैसर्गिक नियमाप्रमाणे वेळेत पाऊस सुरू होत होता. शेतकरी वर्ग शेतीच्या कामांमध्ये झोकून देत होते. आता नैसर्गिकरीत्या पाऊस सुद्धा विलंबाने पडत असल्याने शेतकरीवर्ग पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभाग व महसूल विभागाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. परंतु ज्या ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. त्या ठिकाणी पंचनाम्यासाठी शासकीय पातळीवर कर्मचारी व अधिकारी उपस्थित राहत नसल्याची खंत काही शेतकरी व्यक्त करत आहे. त्याबाबत सातारा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत चर्चा झाली नसल्याची ही बाब उघडकीस आली आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्यालय शेजारी असलेल्या राजेशाही दरबार असल्यासारखा या लोकल बोर्डाच्या इमारतीमध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सदस्यांनी एकजुटीने व एका दिलाने प्रयत्न करावे. कारण, या लोकल बोर्डाच्या इमारतीमध्ये काही सदस्यांनी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले होते. जनतेच्या सेवेसाठी पोट तिडकीने प्रश्न मांडले होते. आता काँग्रेस विचारधारा दिसून येत नसून ज्या काँग्रेसने पुरोगामी विचारातून चालायला शिकवले. आज त्यांचे वंशज आता भाजपचे कमळ हाती घेऊन जनतेची सेवा करत असल्याचे सुगंध पसरवत आहे. याची त्यांना आठवण करून द्यावी वाटते. असे सूचित करावे वाटत आहे. दरम्यान, सातारा जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेनंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांनी उपस्थितांचे आभार मानले.
_________________________________
फोटो– लोकल बोर्ड नूतनीकरण इमारतीमध्ये स्थायी समितीची त्यासाठी उपस्थित असलेले मान्यवर (छाया– अजित जगताप, सातारा)




