नवी मुंबई : 1 एप्रिल 2026 पासून घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 लागू झाले असून याची माहिती नागरिकांपर्यंत विविध माध्यमातून पोहचविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून 5 ते 11 जून 2026 या कालावधीत विविध सोसायट्या व वसाहतींमध्ये विशेष जनजागृती करण्यात आली.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आठही विभाग कार्यालय क्षेत्रात अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांच्या माध्यमातून संबधित स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक यांचेमार्फत नागरिकांपर्यंत पोहचून घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 बाबत लोकजागृती करण्यात येत आहे.
यामध्ये से.14,15 ऐरोली येथील विविध सोसायट्या, दिघा कृष्णावाडी येथील त्रिमूर्ती सोसायटी, सानपाडा येथील मोराज सोसायटी, से.12 कोपरखैरणे येथील फाम सोसायटी व से.5 येथील शकुंतला सोसायटी तसेच से.19 ऐरोली येथील काकासाहेब थोरात सोसायटी, वाशी येथील वर्धमान पॅलेस सोसायटी, सिबीडी बेलापूर से.6 येथील वर्षा सोसायटी अशा विविध सोसायट्यांमध्ये घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 अंतर्गत निर्मितीच्या ठिकाणी घरापासूनच ओला, सुका, घरगुती घातक व सॅनेटरी अशा चार प्रकारे कचरा वर्गीकरण करावयाचा आहे याविषयी माहिती देण्यात आली.
त्याचप्रमाणे वर्गीकरण झालेला कचरा हा कचरा वाहतूक करणा-या वाहनांमध्ये वेगवेगळा देणे अत्यावश्यक असल्याचेही सूचित करण्यात आलेले आहे. दररोज 100 किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणा-या सोसायट्या यांनी स्वत:च्या आवारात कच-याची विल्हेवाट लावणारा प्रकल्प राबविणे नव्या नियमानुसार बंधनकारक असल्याने याविषयी सोसायटी व संस्था पदाधिकारी, सदस्य यांना मार्गदर्शन करण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आठही विभागांमध्ये एजी एन्व्हायरो आणि परिसर सखी या संस्थांच्या वतीने सोसायट्यांमध्ये जाऊन तसेच आस्थापना व संस्था याठिकाणी व्यापक जनजागृती करण्यात येत असून नवी मुंबईकर नागरिकांचा याकामी चांगला प्रतिसाद लाभत आहे.
Post Views: 13