पनवेल (अमोल पाटील) : ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज आजीवली येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
पर्यावरण संवर्धन आणि हरित महाराष्ट्राचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित केली. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि जंगलांची घटती संख्या लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, युवक तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेत वृक्षसंवर्धनासाठी सक्रिय सहभाग नोंदविला.
यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवड आणि संवर्धन ही काळाची गरज असल्याचे सांगितले. शासनाच्या विविध पर्यावरणपूरक उपक्रमांना जनतेने सहकार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या या वृक्षारोपण उपक्रमामुळे परिसरात पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण झाली असून नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले.




