कराड(ज्ञानेश्वर शेवाळे) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूर नाका उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास आले आहे. लवकरच हा पुल वाहतुकीसाठी खुला होणार असल्याने कराड शहरातील वाहतूकीची कोंडी कमी होणार आहे.
पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील कराड येथील बहुप्रतीक्षित कोल्हापूर नाका उड्डाणपूल आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून पुलाचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. उड्डाणपुलावरील लाइटिंग, साईड पट्टे, सुरक्षा सुविधांसह काही किरकोळ कामे सुरू असून पुढील दोन-तीन दिवसांत ती पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा उड्डाणपूल २० जूनपूर्वी वाहतुकीसाठी खुला होण्याचा मार्ग मोकळा झाला असून गेल्या दोन वर्षांपासून वाहतूक कोंडीने त्रस्त असलेल्या लाखो वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरण प्रकल्पांतर्गत कराड ते नांदलापूर दरम्यान उभारण्यात आलेला हा उड्डाणपूल सातारा ते कागल सहापदरीकरण प्रकल्पातील
मानला जात आहे. हॉटेल पंकज सर्वात मोठा उड्डाणपूल
परिसरापासून नांदलापूरपर्यंत सुमारे ३.४७ किलोमीटर लांबी आणि २९.५ मीटर रुंदीचा हा भव्य उड्डाणपूल तब्बल ९० खांबांवर उभारण्यात आला आहे.
या प्रकल्पाची जबाबदारी असलेल्या अदानी कंपनीकडील मुख्य पुलबांधणीचे काम पूर्ण
झाले असून आता फक्त उड्डाणपूल महामार्गाला जोडण्याचे अंतिम काम शिल्लक आहे. हॉटेल पंकजसमोरील भागात आणि पुलाच्या उतरणीच्या ठिकाणी जोडरस्त्यांची कामे सुरू असून ती पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकल्पाला विविध तांत्रिक कारणांमुळे तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. परिणामी कामाचा वेग मंदावला आणि कराडच्या कोल्हापूर नाका परिसरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत गेली. विशेषतः शनिवार, रविवार
आणि सलग सुट्ट्यांच्या काळात पुणे, कोल्हापूर, कोकण, गोवा तसेच कर्नाटककडे जाणाऱ्या वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे येथे तासन्तास वाहतूक ठप्प होत होती.
उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर महामार्गावरील वाहने थेट पुलावरून मार्गक्रमण करतील.
त्यामुळे कोल्हापूर नाका चौकातील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणावर कमी होणार असून शहरातील अंतर्गत वाहतूक आणि महामार्गावरील वाहतूक स्वतंत्रपणे सुरळीत होण्यास मदत होणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार असून इंधन खर्चातही बचत होणार आहे.
दरम्यान, सहापदरीकरण प्रकल्पातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. कोयना नदीवरील सहापदरीकरणासाठी उभारण्यात आलेल्या दोन नवीन पुलांचे काम पूर्ण झाले असून साताऱ्याकडून कोल्हापूरकडे जाणारी लेन वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली आहे. कराडहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवरील डांबरीकरण अंतिम टप्प्यात असून पुढील दोन दिवसांत तीही वाहतुकीसाठी खुली होण्याची शक्यता आहे. सध्या उड्डाणपुलावरील डांबरीकरण, प्रकाशयोजना, सुरक्षा कठडे, दिशादर्शक फलक, रस्ते चिन्हांकन आणि अन्य सुरक्षाविषयक उपाययोजनांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. पावसाळ्यापूर्वीच हा उड्डाणपूल सुरू करण्याचे प्रशासनाचे नियोजन असल्याने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अधिक गतिमान आणि सुरक्षित होणार आहे.
उड्डाणपूल आणि कोयना नदीवरील नवीन पुलांचे काम पूर्णत्वास येत असल्यामुळे पुणे-बंगळुरु महामार्गावरील वाहतुकीला मोठा दिलासा मि ळणार असून कराड परिसरातील वाहतूक व्यवस्थेत ऐतिहासिक बदल घडणार असल्याचे चित्र आहे.
चौकट
“कराड उड्डाणपुलाचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. सध्या एक्स्पॅन्शन जॉइंटचे काम सुरू असून उजव्या बाजूचे काम पूर्ण झाले आहे. डाव्या बाजूला काही जॉइंटचे काम शिल्लक असून ते सोमवारपर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. फ्लायओव्हरवरील रोड मार्किंग, थर्मोप्लास्ट कोटिंग आणि कॅट आय बसविण्याची कामे पूर्ण झाली आहेत. केवळ क्रैश बॅरियरचे रंगकाम, ड्रेनेज स्पाऊट आणि काही पूरक कामे अंतिम टप्प्यात आहेत. लाईट पोल उभारणीचे कामही वेगाने सुरू आहे. उर्वरित सर्व कामे येत्या चार ते पाच दिवसांत पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. हा पूल शक्य तितक्या लवकर वाहतुकीसाठी खुला व्हावा, ही आमचीही इच्छा आहे. त्यामुळे २० जूनदरम्यान या उड्डाणपुलावर वाहतूक सुरू करण्याचे आमचे नियोजन आहे.”
– ऋषीदेव मिश्रा, असोसिएट मॅनेजर, अदानी




