मुंबई(संतोष लिंबोरे) : आषाढी एकादशीचे औचित्य साधत मराठी व्यावसायिक वाद्यवृंद निर्माता संघ आणि कलानिधी समितीतर्फे यंदाही ‘पाऊले चालती’ या विनामूल्य विठ्ठल भक्तिगीत संध्याचे आयोजन करण्यात आले आहे. गेली ११ वर्षे अखंड सुरू असलेल्या या सांगीतिक परंपरेत यंदा ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर यांना प्रतिष्ठेचा ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम २४ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता दादर (पश्चिम) येथील छत्रपती श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात होणार असून रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे.
यावेळी मराठी वाद्यवृंद क्षेत्रात ४,५०० हून अधिक प्रयोग सादर करणारे निर्माते उदय साटम, सुशिल आंबेकर तसेच अभिनेत्री व नृत्यांगना मेघा घाडगे यांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे. याशिवाय वाद्यवृंद व्यवस्थापक हरि पाटणकर, प्रकाश योजनाकार रोहीदास होडे, ध्वनी संयोजक नरेश पाटील, चरित्र कलाकार गणेश टिकम, नृत्य दिग्दर्शक शशिकांत जाधव, तालवादक किशोर खुशाले, संगीत संयोजक परेश धामणस्कर, निवेदक परेश दाभोळकर, गायक संतोष कोरगावकर आणि गायिका सपना हेमण यांनाही विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
विठ्ठल भक्ती, संगीत आणि मराठी वाद्यवृंद परंपरेचा संगम घडवणाऱ्या या कार्यक्रमाला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.




