
नवी मुंबई : आषाढी एकादशीचे औचित्य साधत धगधगती मुंबई वृत्तपत्र परिवारातर्फे सालाबादप्रमाणे सेक्टर ५, कोपरखैरणे येथील शारदा विद्या मंदिर व प्री. प्रायमरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी भक्तिमय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी चिमुकल्यांना राजगिरा लाडू व केळी वाटप करून आषाढी एकादशीचा आनंद साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामाचा गजर करत भक्तिगीतांवर सुंदर नृत्य सादर केले, तर मुलींनी पारंपरिक फुगड्या खेळून वारकरी संप्रदायाची संस्कृती जिवंत केली. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांसमवेत सहभागी होत आनंदोत्सव अधिक रंगतदार केला.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कोपरखैरण्याचे समाजसेवक व प्रसिद्ध हाडवैद्य सचिन शेठ वरखडे, समाजसेवक नितीन मामा हिंगे, संस्थापक-अध्यक्ष रमेश संकपाळ, संचालिका सौ. दीपाली रमेश संकपाळ, पत्रकार भीमराव धुळप तसेच शाळेतील सर्व शिक्षिका व सेविका उपस्थित होत्या. विठ्ठलभक्ती, संस्कार आणि समाजसेवेचा संगम घडविणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनात भक्तिभावाची पेरणी करून गेला.




