ताज्या बातम्या

२ मिनिटांत करा तोंडाच्या कॅन्सरची तपासणी; तज्ज्ञांचे मुंबईकरांना आवाहन

मुंबई : देशभरात हेड अँड नेक कॅन्सरच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून, त्यातील सुमारे ६२ टक्के प्रकरणं ही केवळ मौखिक कर्करोगाची असून ही एक चिंतेची बाब ठरत आहे. कर्करोगाच्या वेळीच निदानासाठी नागरिकांमध्ये जागरूकता वाढवणे आणि नियमित स्वयं तपासणीची सवय अंगीकारणे अत्यंत गरजेचे ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसिध्द ऑन्कोलॉजिस्ट डॉ. सेवांती लिमये( डायरेक्टर – मेडिकल अँड प्रिसिजन ऑन्कोलॉजी, सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल) यांनी मुंबईकरांना दर महिन्याला केवळ दोन मिनिटे वेळ काढून “Feel, Look & Act” ही सोपी पण प्रभावी सवय अंगीकारण्याचे आवाहन केले आहे.

हेड अँड नेक कॅन्सर जागरूकता महिन्यानिमित्त मर्क स्पेशालिटीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेली तोंडाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी दोन मिनिटांची कृती (Two-Minute Action for Oral Cancer Protection) ही मोहीम #ActAgainstOralCancer या हॅशटॅगअंतर्गत मुंबईत मोठ्या प्रमाणावर राबविली जात . या मोहिमेद्वारे नागरिकांना आरशासमोर दोन मिनिटांत स्वयं तपासणी करून तोंडाच्या कॅन्सरच्या सुरुवातीची लक्षणे ओळखण्यास आणि वेळीच उपचार घेण्यास प्रोत्साहन दिले जात आहे.

हेड अँड नेक कॅन्सर हा कर्करोगाचा एक व्यापक प्रकार असून यामध्ये नाकाजवळील सायनस, नाकाची पोकळी, तोंड, घसा (फॅरिंक्स) आणि स्वरयंत्र (लॅरिंक्स) या भागांमध्ये होणाऱ्या कर्करोगांना समावेश आहे. यापैकी बहुतांश कॅन्सर हे स्क्वॅमस सेल कार्सिनोमा (SCCHN) प्रकारात मोडतात. तंबाखू आणि मद्यपान हे त्याचे प्रमुख कारण आहे. याशिवाय ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV)हा देखील काही प्रकारांमध्ये कारणीभूत असल्याचे आढळून आले आहे.

डॉ. सेवांती लिमये म्हणाल्या, हेड अँड नेक कॅन्सरमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात तोंडातील न भरुन येणारी जखम, गिळताना होणारा त्रास, आवाजात होणारा बदल किंवा मानेला येणारी सूज अशी लक्षणे दिसू शकतात. प्रगत अवस्थेत तीव्र वेदना, वजन घटणे, रक्तस्राव आणि खाताना किंवा बोलताना अडचणी येणे अशी लक्षणे दिसतात. भारतात जवळपास ८० टक्के प्रकरणं ही तंबाखूच्या सेवनाशी संबंधित आहेत. सुपारीचे सेवन, मद्यपान आणि एचपीव्ही संसर्ग ही देखील महत्त्वाची कारणं आहेत.

डॉ. सेवांती त्या पुढे सांगतात की, अनेक टर्शरी केअर रुग्णालयांमध्ये निदान होणाऱ्या एकूण कॅन्सरपैकी सुमारे ३० टक्के प्रकरणं ही हेड अँड नेक कॅन्सरची असतात आणि त्यापैकी ६२ टक्के मौखिक कर्करोगाची असतात. सुमारे ६५ ते ७० टक्के रुग्ण हे ५० वर्षांवरील असले तरी २५ टक्के रुग्ण ५० वर्षांखालील आहेत, यामुळे हा आजार तरुणांमध्येही मोठ्या संख्येने वाढत आहे. प्रतिबंध शक्य असतानाही सुमारे ६० टक्के रुग्ण तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यावर रुग्णालयात येतात, ज्यामुळे उपचार अधिक गुंतागुंतीचे होतात. उपचारानंतरही १०–१५ टक्के रुग्णांमध्ये कॅन्सर पुन्हा होण्याची शक्यता असते, त्यामुळे नियमित फॉलो-अप आणि तपासणी करणे गरजेचे आहे.

तोंडाचा कॅन्सर(मौखिक कर्करोग) पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो .सुमारे ७५ टक्के पुरुष आणि २५ टक्के महिला रुग्णांमध्ये हा कर्करोग आढळून येतो. मात्र भारतात तंबाखू न वापरणाऱ्या व्यक्तींमध्येही तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असून यामध्ये सुमारे २० टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. आज जवळपास ३० ते ४० टक्के नवीन रुग्ण तंबाखूचा वापर न करणाऱ्या गटातील आहेत, ज्यामागे तोंडाची अस्वच्छता, एचपीव्ही संसर्ग आणि आनुवंशिकता कारणीभूत ठरत आहे. गेल्या दहा वर्षात या कॅन्सरचे प्रमाण वाढत असून ३० ते ५० वयोगटातील रुग्णांमध्येही मौखिक कर्करोगाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते.

वेळीच निदान आणि उपचार न झाल्यास हा कॅन्सर शरीराच्या इतर अवयवांमध्ये पसरू शकतो, ज्यामुळे रुग्णाचे आयुष्य आणि जीवनमान खालावते. निदानासाठी क्लिनिकल तपासणी, सीटी/एमआरआय, ओरल व्हिज्युअल इन्स्पेक्शन (OVI) आणि बायोप्सीचा वापर केला जातो. उपचारांमध्ये शस्त्रक्रिया, रेडिएशन, केमोथेरपी आणि निवडक प्रकरणांमध्ये इम्युनोथेरपीचा समावेश होतो. वेळीच तपासणी, तंबाखू आणि मद्यापान टाळणे तसेच लक्षणांबाबत जागरूकता हेच प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहेत असे डॉ. सेवांती यांनी स्पष्ट केले.

त्या पुढे सांगतात की, प्रत्येकाने दर महिन्याला केवळ दोन मिनिटे वेळ काढू स्वयं तपासणी करावी. आरशात आपल्या तोंडाची पाहणी करावी जसे की तोंडात पांढरे किंवा लाल चट्टे आहेत का, दोन आठवड्यांपासून झालेल्या जखमा भरुन आल्या नसतील, अनियमित रक्तस्राव किंवा दात सैल होणे याकडे लक्ष द्या. जबडा किंवा मानेला असलेली गाठ, आवाज बसणे, गिळताना किंवा कानात सतत वेदना जाणवणे अशी लक्षणे आढळल्यास विलंब न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Scroll to Top